आषाढी एकादशीनिमित्त बिर्ला मंदिरात महापूजा
डोंबिवली, ता. ६ : ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर येथील बिर्ला मंदिर रविवारी (ता. ६) पहाटेपासून विठूनामाच्या जयघोषाने निनादून गेले होते. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलनामाच्या गजरात भाविक तल्लीन झाले होते. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल हे सहकुटुंब श्री विठ्ठल-रुख्मिणीच्या महापूजेला उपस्थित राहिले होते. पहाटे पाच वाजता अभिषेक आणि त्यानंतर सहा वाजता भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. मंदिर परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात न्हालेला दिसून आला. या महापूजेला सेंचुरी रेयॉन कंपनीचे ओमप्रकाश चितलांगे, दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे हेही उपस्थित असल्याची माहिती सेंचुरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली. बिर्ला मंदिरात साजरी झालेली आषाढी एकादशी एक भक्तिपूर्ण, मंगलमय आणि संस्मरणीय पर्व ठरली.
...............
नूतन विद्यालयाची पर्यावरणपूरक दिंडी
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : कर्णिक रोड येथील नूतन विद्यालयाने पर्यावरणपूरक दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीत प्लॅस्टिकमुक्ती तसेच वृक्षतोड या विषयांवर भाष्य करण्यात आले. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहून विठू माउलीला अश्रू अनावर झाल्याची चित्राकृती उभारण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रम, अभंगाचे सादरीकरण करण्यात आले. पालकवर्गदेखील यात उत्साहाने सहभागी झाला होता. विविध वारकरी संप्रदायातील संत परंपरा जपणाऱ्या महानुभवांची भूमिका साकारणारे बालकलाकार दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पूर्व प्राथमिक विभागापासून माध्यमिक विभागापर्यंत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच परिसरातील नागरिकांनी या दिंडीत कृतीयुक्त सहभाग घेतला. विठूनामाच्या जयघोषात पर्यावरण दिंडी विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात पोहोचली. शाळेत मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक तसेच पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका दीपाली साबळे यांनी विठ्ठल-रखुमाई आणि पालखी पूजनही केले. विठूरायाच्या जयघोषात विद्यार्थी तल्लीन झाल्याची माहिती शाळेतील शिक्षिका शुभांगी भोसले यांनी दिली.
.................
मोंहिदरसिंग काबलसिंग हायस्कूलमध्ये दिंडी
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : मोहिंदरसिंग काबलसिंग हायस्कूल, ज्युनियर कॉलेज व महाविद्यालयाने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. हा भक्ती सोहळा अतिशय उत्साहात व आनंदमयी वातावरणात पार पडला. चार घोडे, बग्गी, बैलगाडी या साधनासह २०० विद्यार्थ्यांच्या सहभागाने रामकृष्ण हरी, ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठलाच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. ही दिंडी मोहिंदरसिंग शाळेपासून पारनाका, टिळक चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिर ते परत शाळा हा संपूर्ण मार्ग अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाला. हा आषाढी दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष दलबिरसिंग सैनी, सचिव परमप्रीतसिंग सैनी, खजिनदार परमवीरसिंग सैनी, मुख्याध्यापिका जयश्री सुधाकरन, पर्यवेक्षिका ममता गैरोला यांचे मार्गदर्शन लाभले. हा दिंडी सोहळा पार पाडण्यासाठी कांचन जाधव, संपदा निडगुंडी, दर्शना उजागरे, प्रज्ञा कदम, संजय पाटील, महाविद्यालय प्राध्यापिका श्रुती पाटील, क्लार्क संतोष उपाध्याय, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दिलिप मुरुडकर, सोनूसिंग राठोड, शांती गुप्ता यांनी कामगिरी बजावली. संपूर्ण दिंडी यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक तथा स्काऊट मास्टर दशरथ आगवणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
........................
विठूनामाच्या गजरात रवींद्र चव्हाण तल्लीन
डोंबिवली, ता. ६ : आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फलाट क्रमांक १ वर हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या वतीने भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (ता. ६) सकाळी या सोहळ्याला उपस्थिती लावली. या वेळी वारकऱ्यांसोबत त्यांनी भजनाचा आनंद घेत त्यात तल्लीन झाले. या वेळी विठूमाउलीच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सर्व संकटांपासून दूर ठेव, असे साकडे घातले. विठ्ठलकृपेचा वरदहस्त सर्वांवर सदैव राहो, सर्वांना सुख-समृद्धी व समाधान लाभो तसेच महाराष्ट्राच्या सेवेसाठी आणखी बळ लाभो, अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना त्यांनी केली.
.....................
निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रात पोषण आहार वाटप
टिटवाळा (वार्ताहर) : निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार राजेश मोरे यांनी भेट दिली. त्यांनी ८० क्षयरुग्णांना ‘नि:क्षय पोषण आहार’ वाटप करीत सामाजिक बांधिलकी जपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या टीबी निर्मूलन अभियानात २०२५पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्य सरकारने ‘नि:क्षय पोषण आहार योजना’ सुरू केली आहे. या योजनेतून क्षयरुग्णांना औषधोपचारासोबत सकस आहार दिला जातो. या उपक्रमात आमदार राजेश मोरे यांनी ‘नि:क्षय मित्र’ म्हणून पुढाकार घेत तांदूळ, डाळ, मटकी, खाद्यतेल, शेंगदाणे अशा पोषणद्रव्यांनी भरलेली ‘फूड बास्केट’ ८० क्षयरुग्णांना वाटप केली. याप्रसंगी आमदार मोरे म्हणाले, ‘‘निळजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात व्हावे, यासाठी मी प्रस्ताव पाठवायला सांगणार आहे तसेच मंजुरीसाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम जयकर यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतल्याचे नमूद केले. निळजे पीएससीचे डॉ. गोविंद उपाध्याय, जिल्हा क्षयरोग कार्यालयातील डॉ. चारुलता धानके, विस्तार अधिकारी मोहन गायकवाड, समुदाय आरोग्य अधिकारी अक्षेना कोरे तसेच विविध आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी उपस्थित होते.
......................
मानिवली शाळेत शैक्षणिक साहित्यवाटप
डोंबिवली (बातमीदार) : जिल्हा परिषद शाळा, मानिवली येथे शनिवारी (ता. ५) अचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, कल्याण यांच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानिवली हे गाव अचिव्हर्स कॉलेजच्या एनएसएस युनिटद्वारे दत्तक घेतले आहे. येथे दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यंदा १६५ गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर उपयोगी येणाऱ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, क्रेयॉन्स रंग आदी साहित्याचा समावेश आहे. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आत्मविश्वास व आनंद दिसून आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जाणिवेसोबत सामाजिक भान आणि जबाबदारीची भावना विकसित होत आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अचिव्हर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. सीए महेश भिवंडीकर आणि ट्रस्टी सीए गौरांग भिवंडीकर उपस्थित होते. तसेच वर्षा रिफ्रॅक्टरी या संस्थेच्या वतीने प्रकाश मेहता, भावेश मेहता, वर्षा मेहता, अंजली मेहता आणि सीए कौशिक गडा हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रभावी समन्वयन एनएसएस कार्यक्रम अधिकारी राजेशकुमार यादव आणि श्रीमती ज्योतिका मोटवानी यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गायकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती गायकर, सदस्या साक्षी गायकर, शाळेचे मुख्याध्यापक विजय प्रगणे, नंदू चौधरी, मंगल डोईफोडे, माधुरी जंगले, कीर्ती पाटील आणि शिक्षकवृंद या कार्यक्रमास उपस्थित होते.
..........................