थोडक्यात :
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा साम्राज्य अब्दालीविरुद्ध लढले आणि मोहिमेचं नेतृत्व सदाशिवराव भाऊंकडे सोपवण्यात आलं.
नानासाहेब पेशव्यांचे पुत्र विश्वासराव आणि अनेक पेशवे घराण्यातील सदस्यही या युद्धात सहभागी झाले.
विश्वासरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाला अफगाणिस्तान नेण्याचा प्रयत्न झाल्याची गोष्ट तुम्हाला माहितीये का ?
News : मराठ्यांच्या इतिहासातील भळभळती जखम म्हणजे पानिपतची तिसरी लढाई. या लढाईने मराठ्यांचं साम्राज्य उध्वस्त केलं. या लढाईतील नुकसान भरून काढायला माधवराव पेशवेंचं संपूर्ण आयुष्य खर्ची पडलं. जवळपास एक संपूर्ण तरुण पिढी मराठ्यांनी या लढाईत गमावली. या लढाईच्या अनेक कथा नंतर इतिहासात नोंदवल्या गेल्या. पण तुम्हाला माहितीये का ? या लढाईत मारल्या गेलेल्या एका पेशव्याचा मृतदेह अफगाणला नेण्याचा प्रयत्न अफगाणी सैनिकांनी केला होता पण मराठ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत तसं होऊ दिलं नाही.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अब्दालीविरुद्ध मराठा साम्राज्य उभे राहिले. त्यावेळेचे पेशवे असलेल्या नानासाहेब पेशव्यांनी ही मोहिम सदाशिवराव भाऊंवर सोपवली. तर नानासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र विश्वासराव हे सुद्धा सदाशिवराव भाऊंबरोबर लढाईला गेले. त्यांच्याबरोबर पेशवे कुटूंबातील अनेक लोक खुद्द सदाशिवराव भाऊंच्या पत्नी पार्वतीबाईही होत्या. पण तुम्हाला माहितीये का ? पानिपतच्या लढाईत विश्वासरावांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह अफगाणिस्तानला नेण्याचा प्रयत्न झाला होता.
इतिहासात अशी नोंद आहे की, नानासाहेबांच्या तिन्ही पुत्रांमध्ये सगळ्यात सुंदर विश्वासराव होते. असं म्हणतात आजोबा बाजीराव पेशवेंच्या निळ्या डोळ्यांची देणगी विश्वासरावांनाही मिळाली होती. आता यात कितपत तथ्य आहे हे माहित नसलं तरीही विश्वासरावांना पेशव्यांच्या घराण्यातील सगळ्यात सुंदर तरुणाची उपमा दिल्याची नोंद अनेक ठिकाणी पाहायला मिळते. गोपिकाबाईंना नानासाहेबांच्या पश्चात विश्वासराव पेशवे म्हणून हवे होते आणि केवळ याच हट्टापायी सदाशिवराव भाऊंना पानिपतची लढाई जिंकल्याचा श्रेय मिळू नये म्हणून विश्वासरावांना या मोहिमेवर वय लहान असूनही पाठवण्यात आलं होतं.
पानिपतच्या भूमीवरून अब्दालीचं सैन्य पाहून विश्वासराव यांनी वडील नानासाहेबांना लिहिलेलं पत्र लक्ष वेधून घेतं. ते म्हणतात,"फौज व खजिना पाठवणे. मी आपल्यासाठी लिहीत नाही. माझ्यासारखे पुत्र आपल्यास आणखी आहेत व होतील; परंतु भाऊसाहेबांसारखा बंधू मिळणार नाही."
14 मार्च 1760 मध्ये मराठी फौजा सदाशिवराव भाऊ व विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर हिंदुस्थानात निघाल्या. त्यावेळी विश्वासरावांचं वय 18 वर्षांचं होतं. विश्वासरावांच्या हाती स्वतंत्र अशी दहा हजारांची फौज पानिपतच्या युद्धात होती. पानिपतच्या रणभूमीवर 14 जानेवारी 1761 या दिवशी सदाशिवराव भाऊ मराठी सैन्याच्या मध्यभागी प्रथम हत्तीवर बसून लढत होते. सकाळी लढाई सुरु झाली. त्यावेळी विश्वासराव हत्तीवरून लढत होते त्यानंतर दुपारी ते दिलपाक नावाच्या घोड्यावर बसून लढाई करू लागले. पण तिसऱ्या प्रहरी त्यांना गोळी लागली. त्यातच ते धारातीर्थी पडले.
जवळच असलेल्या सदाशिवराव भाऊ यांनी विश्वासरावांचं पार्थिव हत्तीवरील अंबारीत ठेवलं आणि बापूजी हिंगणे यांना तिथे देखभालीसाठी ठेवलं. विश्वासराव पडताच धीर खचलेल्या मराठी सैनिकांची पळापळ सुरु झाली. सदाशिवराव भाऊ विश्वासरावांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आवेशाने शत्रूसेनेत घुसले. तर विश्वासराव पेशवे यांचा मृतदेह ज्या अंबारीत ठेवला होता तो हत्ती अफगाण सैन्याच्या हाती लागला. त्यांनी बापूजी हिंगणेंना कैद केलं. ही बातमी शुजादौल्लास लागल्यावर त्याने ते पार्थिव ताब्यात घेतलं. अब्दालीने स्वार पाठवून ते पार्थिव पाहण्यासाठी त्याच्या छावणीत आणलं. अठरा वर्षाच्या त्या सुंदर तरुणाचं प्रेत पाहून अनेकजण हळहळले.
तिथे उपस्थित असलेल्या दुराणी शिपायांनी अब्दाली यास या मराठी राजाचं प्रेत आम्हाला द्या, आम्ही त्यात पेंढा भरून काबूलमध्ये विजयचिन्ह म्हणून नेतो अशी विनंती केली. ही गोष्ट मराठ्यांना कळताच खळबळ उडाली. गणेश वेदांती आणि काशीराजा यांनी अब्दालीला विनंती करून एक लाख रुपये भरून विश्वासरावांचं प्रेत सोडवून आणलं. त्यानंतर त्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
FAQs :
प्रश्न: पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोण मराठा सेनापती होता?
उत्तर: सदाशिवराव भाऊ हे युद्धाचे प्रमुख मराठा सेनापती होते.
प्रश्न: विश्वासराव कोण होते आणि ते युद्धात का गेले होते?
उत्तर: विश्वासराव हे नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र होते आणि त्यांनी युद्धात भाग घेतला होता.
प्रश्न: पानिपतच्या युद्धात कोणकोणते पेशवे घराण्याचे सदस्य सहभागी झाले होते?
उत्तर: विश्वासराव, सदाशिवराव भाऊ यांच्यासह त्यांच्या पत्नी पार्वतीबाई आणि इतर अनेक सदस्य सहभागी झाले होते.
प्रश्न: विश्वासरावांचा मृतदेह अफगाणिस्तान नेण्याचा प्रयत्न का केला गेला?
उत्तर: यामागील नेमकं कारण स्पष्ट नाही, पण काही ऐतिहासिक संदर्भातून असे प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते, जे अद्याप संशोधनाचा विषय आहे.