तुमच्या आजूबाजूला दिसणारी दिसणारी एखादी व्यक्ती हसली की ती आनंदीच आहे, असे गृहित धरले जाते. मात्र तुमच्या अवतीभोवती असलेली व्यक्ती आनंदी जरी दिसत असली तरी ती आतून दु:खाने ग्रासलेली, एकाकीपणाने वेढलेली असू शकते. त्यामुळे एकटेपणा ही बाब आता फक्त भावनात्मक स्थिती राहिलेली नाही. एकाकीपणा हे वैश्विक पातळीवरचं आरोग्यविषयक संकट म्हणून समोर आले आहे. हीच बाब लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने 2023 साली एकाकीपणाला आरोग्यावरील वैश्विक संकट म्हणून जाहीर केले आहे.
एकाकीपणा आणि त्यातून येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने एक आंतरराष्ट्रीय आयोगाची स्थापना केलेली आहे. एका रिपोर्ट्सनुसार जगातील प्रत्येक सहावी व्यक्ती एकाकीपणाने ग्रासलेली आहे. म्हणजेच काही लोक हे रोज अनेकांच्या संपर्कात येत असले तरी ते आतून एकाकीपणाशी झुंज देत आहेत.
तज्ज्ञांच्या मते एकाकीपणामुळे मानसिक स्वास्थ बिघडते. सोबतच याचा शारीरिक स्वास्थ्यावरही परिणाम पडतो. अमेरिकेतील तज्ज्ञांच्या मते एकाकपीणामुळे शरीरावर होणारा परिणाम हा प्रतिदिन 15 सिगारेट ओढण्याएवढा घातक आहे. एकाकीपणामुळे डिप्रेशन, एग्झांयटी, आत्महत्येला प्रवृत्त होणे, हृदयरोग यासारख्या अडचणी येतात. आश्चर्यकारक बाब म्हणजे एकाकीपणाच्या समस्येमुळे प्रत्येक तासाला 100 लोकांचा मृत्यू होत आहे.
एका रिपोर्टनुसार जगात 5 ते 15 टक्के किशोरवयीन मुलं एकाकीपणाच्या समस्येतून जात आहेत. आफ्रिकेत हा आकडा 12.7 टक्के आहे. तर युरोपात 5.3 टक्के किशोरवयीन मुलं एकाकीपणाच्या अडचणीतून जात आहेत. त्यामुळे एकाकीपणाला दूर घालवण्यासाठी नेमकं काय करायला हवं? असा सवाल उपस्थित केला जातोय.
दरम्यान, तुम्हालाही एकाकीपणाची समस्या जाणवत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहा. तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत वेळ घालवा. मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. सोबतच सोशल मीडियासारख्या आभासी जगापासून दूर होऊन प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळायला हवे.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)