स्थूलता आणि नैराश्य : एक दुधारी तलवार
esakal July 08, 2025 10:45 AM

स्थूलता म्हणजे केवळ शरीरावर साचलेली अतिरिक्त चरबी नाही; ती मनावरही ताण निर्माण करणारी स्थिती आहे. तसेच, नैराश्यामुळे खाण्याच्या सवयी बदलतात आणि वजन वाढण्याची शक्यता जास्त होते. ही अशी दुहेरी चक्रव्यूहासारखी समस्या आहे, जिच्यातून बाहेर पडायला शारीरिकच नव्हे, तर मानसिक शक्तीही लागते. या लेखात आपण स्थूलता आणि नैराश्य यांच्यातील परस्परसंबंध, कारणे, लक्षणे आणि उपायांची सखोल माहिती पाहू.

रुग्णाचे नाव : मीना (नाव बदललेले), वय: ३८ वर्षे, पेशा : शाळेतील शिक्षिका, मागील वैद्यकीय इतिहास : लठ्ठपणा (BMI 33), PCOS, मधुमेहाचा प्रारंभिक टप्पा.

तक्रारी : थकवा, उदासपणा, वजन वाढ, झोपेचा अभाव

मीना क्लिनिकमध्ये खूप थकलेली आणि निराश अवस्थेत आल्या. त्यांचे म्हणणे होते, ‘सकाळी उठण्याची इच्छा होत नाही. गेल्या वर्षभरात १२ किलो वजन वाढले. माझा चेहरा आरशात बघवत नाही. मी मित्रमैत्रिणींना भेटणं बंद केलंय. वजन कमी करायचंय, पण काहीच उत्साह वाटत नाही...’

मानसिक आरोग्य मूल्यांकन

  • मूड : उदास, रडवेला

  • झोप : खंडित, सकाळी थकवा

  • भूक : वाढलेली, विशेषतः गोड खाण्याची इच्छा

  • हालचाल : जवळपास नाहीच

  • सामाजिक आयुष्य : दुरावलेली, एकलकोंडेपणा

  • PHQ-9 स्कोअर : मध्यम ते तीव्र नैराश्य

दुष्टचक्र : लठ्ठपणा आणि नैराश्य

  • नैराश्याची कारणे - परिणामी वर्तन - लठ्ठपणाचा परिणाम

  • ऊर्जा कमी - हालचाल कमी - वजनवाढ

  • झोपेचा अभाव - हार्मोन बिघाड - गोड खाण्याची प्रवृत्ती

  • आत्मविश्वास कमी - भावनिक खाणे - आणखी वजन वाढ

  • सामाजिक अंतर - एकलकोंडेपणा - आधार आणि प्रेरणा कमी

  • नकारात्मक शरीरप्रतिमा - अपराधी भावना, तणाव - नैराश्य अधिक वाढते

लॅब रिपोर्ट्स

HbA1c: 6.1% (मधुमेहपूर्व स्थिती). लिपिड प्रोफाईल: LDL वाढलेले, HDL कमी. व्हिटॅमिन D: कमतरता. TSH: सामान्य

तीन महिन्यांनंतरचा प्रगती अहवाल

वजन : चार किलो

मूड : लक्षणीय सुधारणा

झोप : शांत झोप

हालचाल : दररोज चालणे + ग्रुप योगा

नैराश्य स्कोअर : सौम्य

मीना म्हणाली, ‘आता वाटतंय की आयुष्यावर पुन्हा ताबा घेतलाय. अजून बरीच वाट आहे, पण आशा वाटतेय.’

स्थूलतेचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम

आत्मसंतोष कमी होतो : लठ्ठपणामुळे सौंदर्यदृष्टिकोनातून स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होतो. ‘मी चांगला/चांगली दिसत नाही’ असा भाव निर्माण होतो.

सामाजिक तिरस्कार आणि बॉडी-शेमिंग : बाहेर फिरताना, ऑफिसमध्ये, सोशल मीडियावर त्रास होतो. परिणामतः लोक एकटे राहायला लागतात.

सतत आहार, वजन, डाएट याचा ताण :

  • डाएट सुरू

  • वजन वाढ

  • निराशा

  • खाणं वाढ

  • पुन्हा वजन वाढ.

ही मानसिक आणि भावनिक दमछाक निर्माण करणारी चक्र.

नैराश्यामुळे स्थूलता कशी वाढते?

भावनिक खाणे (Emotional Eating) : राग, दुःख, कंटाळा, नैराश्य यावेळी गोड किंवा फास्ट फूड खाण्याकडे झुकाव.

झोपेचा अभाव : नैराश्यामुळे झोप होत नाही.

  • झोपेची कमतरता

  • हार्मोनल असंतुलन

  • भूक वाढते

  • वजन वाढ.

निष्क्रियता : मन खचलेलं असल्याने चालायला, व्यायामाला इच्छा राहत नाही. यामुळे चरबी अधिक साचते.

औषधांचे दुष्परिणाम : काही अँटी-डिप्रेसंट औषधे वजन वाढवतात

वैज्ञानिक पुरावे काय सांगतात?

  • जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल : लठ्ठ व्यक्तींमध्ये नैराश्याचा धोका ५५ टक्के अधिक

  • Journal of Psychiatry (2020) : नैराश्य असलेल्या व्यक्तींमध्ये स्थूलता होण्याची शक्यता दुप्पट

  • दोन्ही एकत्र येतात तेव्हाची लक्षणे : स्वतःच्या शरीराबद्दल तिरस्कार वाटणे, आहाराबद्दल अपराधी भावना, एकाकीपणा, लोकांपासून दूर जाणे, झोपेचा अभाव, सतत थकवा, स्वतःवर कंट्रोल नसल्याची भावना

  • सामाजिक परिणाम : नोकरीमध्ये प्रगती थांबते, नातेसंबंधांमध्ये तणाव, समाजात कमी सहभाग, आर्थिक खर्च वाढतो (औषधे, डॉक्टर, डाएट)

उपाय आणि मार्गदर्शन

बहुआयामी उपचार योजना

मानसिक आरोग्य : CBT (कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी), सपोर्ट ग्रुप

आहार : आहारतज्ज्ञांकडून सल्ला व नियोजित आहार योजना

शारीरिक हालचाल : सौम्य व्यायाम, योगा, चालणे सुरू करणे

वैद्यकीय : इन्सुलिन रेसिस्टन्ससाठी मेटफॉर्मिन विचारात घेणे

औषधोपचार (वैकल्पिक) : मानसिक आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे

1) समुपदेशन (Counseling) आणि CBT : विचारांची दिशा बदलणे, भावनांवर नियंत्रण मिळवणे, अन्नासोबत असलेला भावनिक संबंध तोडणे

2) छोट्या टप्प्यांत जीवनशैली सुधारणा : एकदम मोठे डाएट न घेता हळूहळू बदल. रोज १५ मिनिटे चालण्यापासून सुरुवात. गोडाचे प्रमाण कमी करणे.

3) गट उपचार (Support Groups): समान अनुभव असलेल्यांचा सहवास. प्रेरणा आणि समर्थन मिळवणे.

4) झोप आणि दिनक्रम निश्चित करणे : मोबाईल वापर झोपण्याच्या १ तास आधी बंद. ठराविक वेळेची झोप, उठणे.

5) व्यायाम + मानसिक आरोग्याचा संयोग : योग, प्राणायाम, ध्यान हे शारीरिक, मानसिक पातळीवर उपयोगी. स्ट्रेस हार्मोन (Cortisol) कमी होतो.

स्थूलता आणि नैराश्य यांचे नाते परस्पर वाढणारे आहे; पण त्यावर मात करणे शक्य आहे. लठ्ठपणा आणि नैराश्य एकत्र दिसतात आणि एकमेकांना वाढवतात. एका गोष्टीवर उपचार केल्यास दुसरी सुधारते. निर्दोष, बहुविषयक उपचार आवश्यक आहेत. लहान बदलांमधून मोठे परिणाम होतात. मानसिक आरोग्याचा विचार करणे तितकाच महत्त्वाचा आहे जितका आहार आणि व्यायाम.

‘शरीराचे आरोग्य सांभाळताना, मनाचेही रक्षण केलं पाहिजे.’ स्वतःवर प्रेम करा, स्वीकार करा, आणि त्यातूनच आरोग्याकडे प्रवास सुरू करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.