भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुसरा सामना जिंकत कमबॅक केलं आहे. यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह नव्हता तरी देखील भारताने हा सामना जिंकला. पण तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह असणार यावर मोहोर लागली आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर कर्णधार शुबमन गिलने याबाबत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लॉर्ड्स कसोटी सामन्यात सर्वांचं लक्ष हे अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे लागून आहे. कारण ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहने या संधीचं सोनं करण्याचा निश्चय केला आहे. यासाठी त्याने ऑप्शनल प्रॅक्टिस सेशनमध्ये भाग घेतला. यात फक्त 11 खेळाडू होते. त्यात जसप्रीत बुमराहचा समावेश होता. जसप्रीत बुमराहने पूर्ण ताकदीने गोलंदाजी केली. यावेळी त्याने नेटमध्ये फलंदाजी करणाऱ्यांना वारंवार अडचणीत आणलं.
मिडिया रिपोर्टनुसार, तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या जागी त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण प्रसिद्ध कृष्णा पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात महागडा ठरला होता. बुमराहने नेटमध्ये अभिमन्यू ईश्वरन आणि साई सुदर्शन यांना जवळपास 30 मिनिटे गोलंदाजी केली. यावेळी त्याची लाईन अँड लेंथ जबरदस्त होती. त्यामुळे टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी आहे. लॉर्ड्सची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करते. या पार्श्वभूमीवर इंग्लंडने बुमराहची धास्ती घेतली आहे. इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम याने लॉर्ड्सची खेळपट्टी बदलण्याचे संकेत दिले आहेत. जर वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी असेल तर इंग्लंडला खूपच कठीण जाईल.
पर्यायी सराव शिबिरात काही स्टार खेळाडूंनी भाग घेतला नाही. लंडनला आल्यानंतर शुबमन गिल, ऋषभ पंत, केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी आराम केला. एजबेस्टन कसोटी सामन्यात खेळलेले वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीपने वर्कलोड मॅनेजमेंट आणि रिकव्हरीसाठी या सराव शिबिरात भाग घेतला नाही. भारत इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून सुरु होणार आहे.