मिरा-भाईंदरमध्ये काल मराठी भाषिकांचे आंदोलन झाले, तो सरकारसाठी मोठा इशारा म्हटले तर वावगं ठरणार नाही. हे आंदोलन मनसेच्या हातून लोकांच्या हातात कधी गेलं ते कळलं सुद्धा नाही. अर्थात सत्ताधारी त्यामागे काँग्रेस, कम्युनिस्ट, उद्धव सेनेचा हात असल्याचा आरोप करत असले तरी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होत्या हे समोर आले. मराठी माणसांच्या मनातील असंतोषाची ती एक चुणूक होती. ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ असाच आंदोलनाचा अघोषित नारा होता. पण राज ठाकरे यांच्या नवीन आदेशाने सध्या गोंधळाची स्थिती आहे. त्यावर राजकीय विश्लेषकांनी मतं ही मांडायला सुरुवात केली आहे. काय आहे यामागील ‘राज’नीती, जाणून घेऊयात…
काय आहे ती भूमिका?
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमुळे गोंधळ उडालेला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनीही आपल्या प्रवक्त्याना सांगितले आहे की, राज ठाकरे यांच्याबद्दल काही बोलायचे नाही,आणि आता दोघांचा एकमेकांशी अर्थ आहे का नाही. हे काही कळत नाही, असे उन्हाळे यांनी स्पष्ट केले.
पण एक गोष्ट खरी आहे, मीरा भाईंदर मध्ये लोकांनी उठाव केला होता, लोकांनी आंदोलन हातात घेतले होते, आणि त्याठिकाणी संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर या ठिकाणी व्यवस्थित माध्यमांशी बोलले. पण प्रश्न असा आहे की, माध्यमांशी बोलायचे नाही. हा जो एक प्रकारचा फतवा काढला आहे, यामागचे काय गूढ आहे, हे अजून उलगडलेले नाही,
निशिकांत दुबे यांनी जी गरळ ओकली आणि ते मनसेच्या विरोधात टार्गेट करून होते, तेव्हा मनसेचे अनेक प्रवक्ते अस्वस्थ झाले की, आपण बोलले पाहिजे. त्यांनी संपर्क साधला तर त्यांना कुणी प्रतिसाद दिला नाही. राज ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद न गेल्यामुळे, निशिकांत दुबे यांच्या बद्दल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिली, पण त्यावर राज ठाकरे यांच्या गटाकडून प्रतिक्रिया आली नाही. आता प्रतिक्रिया द्यायची नाही, याच्या मागचे काय धोरण आहे कळत नाही, असे उन्हाळे म्हणाले.
राज ठाकरेंच्या भूमिकेने गोंधळ
एका बाजूला मिरा भाईंदरचे आंदोलन लोकांनी हातात घेतले आहे, आणि जे लोकनेते आहेत, त्यांना गप्प बसण्यासाठी सांगण्यात आले आहे. माझ्या माहितीप्रमाणे प्रवक्त्यांची कधी बैठक झाली नाही. प्रवक्त्यांना काही गाईडलाईन देण्यात आल्या नाही. माध्यमांनी प्रवक्त्यांशी संबंध साधने हे नैसर्गिक आहे. आणि तेव्हा प्रवक्त्याला कळत नाही आपण काय करायचे. हा जो राज ठाकरे यांनी काढलेला आदेश आहे, हे ट्विट करण्याची काही गरज नव्हती, फक्त मॅसेज द्यायचा होता की, बोलु नका, असे उन्हाळे यांना वाटते.
राज ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिला आहे म्हणजे, प्रवक्ते काही गोंधळ घालत असतील. राज ठाकरे यांना काही कन्फ्युजन नको आहे. राज ठाकरे यांच्या मनामध्ये काहीतरी गोंधळ आहे. ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती झालेली आहे, त्यादिवशी उद्धव ठाकरे मोकळे बोलले पण राज ठाकरे हे राखून बोलले आहेत. प्रश्न असा आहे या युती बद्दल राज ठाकरे यांना काय वाटते, आणि यांचा पुढचा कार्यक्रम काय ठरलेला आहे, असे उन्हाळे यांना वाटते.
त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न
कालच्या आंदोलनात मनसे सोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना रणांगणात उतरली. पण प्रश्न असा आहे, या दोन पक्षांनी मिळून काय करायचे आहे. संजय राऊत यांनी मनसेची बाजू उचलून धरली. दोन पक्षाचे जे एकत्रीकरण व्हायला पाहिजे, युती व्हायला पाहिजे, दोन भावांचा एकमेकांशी जो मेळ जमायला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी प्रश्न आहे, किंवा काहीतरी शंका आहे,असा वाव घ्यावा किंवा व्यक्त व्हावा असा हा आदेश आहे, तेव्हा मला असे वाटते की, राज ठाकरे यांनी याबद्दल स्पष्टीकरण लवकर दिले तर, ते जास्त योग्य राहील. मिरा भाईंदर मध्ये इतका प्रतिसाद मिळाला. पण त्याचे नेतृत्व करणारे राज ठाकरे यांनी व्यक्त झाले पाहिजे. ते व्यक्त झाले तर प्रवक्ते व्यक्त होण्याचे काही कारण नाही, असे उन्हाळे यांना वाटते.
राज ठाकरे कुठल्या दबावात आहेत का?
राज ठाकरे हे कुठल्या दबावात येणारे व्यक्ती नाहीत, ते मनस्वी व्यक्ती आहेत, आणि त्यांच्यावर दबाव आणणे अशक्य आहे. पण त्यांच्यावर एक मानसिक दबाव निर्माण झाला आहे, त्यांना वाटत असावे आपण योग्य करतो की, अयोग्य करतोय, दोन ठाकरे एकत्र आले,तर कोणत्या ठाकरेचे महत्त्व कमी होईल, लोकांमध्ये तुलना होईल का..?
राज ठाकरे यांना वाटते आपण काहीतरी निर्णय घ्यावा, पण हा निर्णय आपण अंतिम घेतलेला नाही, हे त्यांच्या मनात दिसते, पण असे म्हणायला जावे तर त्यांनी दोन्ही ठाकरे यांना एकत्र आणण्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना देऊन टाकले. उद्धव ठाकरे यांचे पत्ते उघडे आहेत पण राज ठाकरे यांचे नाहीत. राज ठाकरे यांचे कौतुक भाजपा आणि शिवसेना शिंदे गट करत आहे, तेव्हा मला वाटते ही स्थिती कठीण आहे.
मनसेच्या मोर्चावर कशासाठी बंधने आणली, अविनाश जाधव यांना पोलीसांनी अटक केली. नंतर सर्वांना सोडून दिले, हे काही झाले ते, यात देखील कन्फ्युजन आणि गोंधळ आहे. आणि राजकारणातील हा गोंधळ राज ठाकरे यांनी मिटवला पाहिजे, असे राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांना वाटते.