दहावीत शिकणाऱ्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल, आत्महत्या करण्यापूर्वी वडिलांना…
Tv9 Marathi July 10, 2025 12:45 AM

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आटपाडी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. या प्रकरणात संशयित आरोपी रामदास गायकवाड याला संतप्त ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आहे. त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ करगणी गाव बंद ठेवण्यात आले होते.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील करगणी गावात कुटुंबासोबत शेतात राहणारी पीडित मुलगी गावातील माध्यमिक शाळेत दहावीत शिकत होती. सोमवारी सकाळी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या आदल्या रात्री तिला काही मुलांकडून त्रास देण्यात आला, अशी माहिती तिने आपल्या वडिलांना दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार होते. मात्र त्या करण्याचा त्यापूर्वीच तिने टोकाचे पाऊल उचलले.

सतत तिला फोन करून त्रास

गेल्या काही दिवसांपासून काही तरुण शाळेत ये-जा करताना तिचा पाठलाग करत होते. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. तसेच मोबाईलवर फोन करूनही त्रास दिला जात होता. यामुळे ती अस्वस्थ होती. राजू विठ्ठल गेंड नावाचा एक तरुण तिच्यावर शरीरसुखासाठी दबाव टाकत होता. तिने यासाठी नकार दिला. त्यामुळे तिला त्रास देण्यात आला. राजू गेंडने तिला जबरदस्तीने गावातील एका खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडिओही काढला. यानंतर राजू गेंडचे साथीदार सतत तिला फोन करून त्रास देत होते, अशी माहिती समोर आली आहे.

दोघे जण अद्याप फरार

या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघे जण अद्याप फरार आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे आटपाडी पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून आणि ग्रामस्थांकडून आटपाडी पोलिसांच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वेळेत योग्य कारवाई न झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप ते करत आहेत. या घटनेमुळे करगणी गावात आणि परिसरात शोककळा पसरली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.