पारंपरिक रुखवत आता 'इंस्टाग्राम फ्रेंडली'
esakal July 10, 2025 01:45 AM

संदीप भेगडे ः सकाळ वृत्तसेवा
किवळे, ता.९ : मुलीच्या लग्नात वधू पक्षाकडून लग्नमंडपात मांडला जाणाऱ्या रुखवताची परंपरा महिलांसाठी खास करुन सासरी निघालेल्या वधूसाठी अतिशय हृदयस्पर्शी बाब ओळखली जाते. मात्र अलीकडच्या काळात पारंपरिक रुखवतामध्ये लक्षणीय बदल झाले असून विशिष्ट संकल्पनेवर आणि आधुनिक स्वरुपात तो मांडला जात आहे. हा रुखवत आता ‘इंस्टाग्राम फ्रेंडली’ बनला आहे.
पूर्वीच्या काळात रुखवत म्हणजे वधू पक्षाच्या घरातील कौशल्यांचा संगम. उखळ, जातं, सूप, हंडा, शेगडी, खलबत्ता, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, पापड, चकल्या, लाडू असे खाद्य पदार्थ आणि हस्तकलेच्या वस्तूंचे रुखवताच्या मांडणीत स्थान असायचे. ही सगळी मांडणी वधू आणि तिच्या घरातील महिला मोठ्या आवडीने तयार करत असत.
त्यामधून वधूचे संस्कार, कलात्मकता आणि सृजनशीलतेची झलक दिसायची. मात्र काळाच्या ओघात जसे विवाह सोहळ्यामध्ये बदल झाले. तसे रुखवाताच्या मांडणीमध्येही बदल झाले आहे. रुखवताचा आता आधुनिकतेकडे प्रवास सुरू झाला आहे.
आजच्या काळातील रुखवत सजावटीकडे झुकलेला आहे. एखादी संकल्पना घेऊन आकर्षक दिवे, शोभिवंत वस्तू, एलईडी स्क्रीनवरील फोटो स्लाइड्स, आधुनिक क्राफ्ट वस्तू अशा माध्यमातून रुखवत ‘इंस्टाग्राम फ्रेंडली’ बनला आहे. काही ठिकाणी व्यावसायिक डेकोरेटर्सकडून रुखवत तयार केला जात आहे. शेती, संस्कृती, पर्यावरण, शिक्षण अशा विषयांवर रुखवताची संकल्पना उदयास येत आहे.

ग्रामीण भागात जुन्या परंपरेवर भर
रुखवतामधील नवीन बदलांमुळे जुनी परंपरा हरवत चालली आहे का ? की ती नव्या रुपात समोर येत आहे? हा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. मात्र, काही कुटुंबे विशेषतः ग्रामीण भागातील लग्नघरी अजूनही पारंपरिक वस्तूंचा समावेश करून सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रुखवताच्या माध्यमातून वधूच्या माहेरच्या आठवणी, संस्कार आणि तिची कलात्मकता व्यक्त होत असते. हे लक्षात घेणे आजही महत्त्वाचे आहे. परंपरेचा आदर राखत आधुनिकतेशी समन्वय साधणे ही काळाची गरज ठरत आहे.
- रेश्मा करपे, व्यावसायिक रुखवत सजावटकार
KIW25B04705

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.