76433
शेकडो आशा कर्मचाऱ्यांचा ‘थाळी नाद’
मुख्यालयात मोर्चा; प्रलंबित मागण्यांबाबत घोषणा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः राज्याने तयार केलेले चार श्रमसंहितांचे कर्मचारी, कामगारविरोधी नियम तत्काळ रद्द करावेत. जुन्या कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यांसह विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनतर्फे ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा थाळी नाद करत मोर्चा काढण्यात आला. शेकडोंच्या संख्येने सहभागी झालेल्या आशा व गतप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी सिंधुदुर्गनगरी परिसर दणाणून सोडला.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीआयटीयू) संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनतर्फे आज ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या मोर्चात महिला कर्मचाऱ्यांनी थाळी नाद करत व जोरदार घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधले. आशा व गतप्रवर्तक यांचा केंद्राचा सहा महिन्यांचा मोबदला थकीत आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी शासन विरोधी घोषणा दिल्या. थाळी नाद करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा कॉ. विजयाराणी पाटील, सचिव कॉ. प्रियंका तावडे, वर्षा परब, अर्चना धुरी, मेघा परब, मेडिकल असोसिएशन सिंधुदुर्ग युनिट सेक्रेटरी जयेश कदम, भाऊ चव्हाण, दत्तप्रसाद गोवेकर यांच्यासह आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.
---
देशव्यापी संप, जिल्ह्यातही आंदोलन
केंद्रीय कामगार व कर्मचारी संघटनांतर्फे आज देशव्यापी एकदिवसीय संप केला. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन ही राष्ट्रीय संघटना यामध्ये सहभागी आहे. या संघटनेला संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन व महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनने या संपामध्ये सहभाग घेतला. देशव्यापी संपानिमित्त या संघटनांतर्फे आज आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.