इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. लीड्समध्ये उभयसंघात पहिला सामना आयोजित करण्यात आला होता. भारताकडून या सामन्यात एकूण 4 फलंदाजांनी 5 शतकं केली. त्यानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने भारतावर मात करत विजयी सलामी दिली आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात पलटवार करत इतिहास घडवला.
भारताने इंग्लंडचा 336 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. भारताचा बर्मिंगहॅममधील हा पहिलावहिला विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. या तिसऱ्या सामन्याबाबत सर्व महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा कसोटी सामना मोबाईलव जिओहॉटस्टार एपवरुन पाहता येईल.
इंग्लंडने लॉर्डसमध्ये होणाऱ्या या तिसऱ्या सामन्यासाठी 9 जुलैला प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली. इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला. जोश टंग याच्या जागी जोफ्रा आर्चर याला संधी देण्यात आली. तर अजूनही टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनबाबत चित्र स्पष्ट नाही.
दरम्यान मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने दोन्ही संघांना मालिकेत आघाडी घेण्याची समसमान संधी आहे. मात्र भारताने दुसरा सामना हा मोठ्या फरकाने जिंकलेला आहे. त्यामुळे भारताचा विश्वास वाढलेला आहे. भारतीय संघ या विश्वासाच्या जोरावर आणि धमाकेदार कामगिरीच्या जोरावर लॉर्ड्समध्ये विजय मिळवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.