वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये इतिहास घडवला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर चौथ्या टी 20i सामन्यात 6 विकेट्सने मात करत विजय मिळवला आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 127 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने ते आव्हान 18 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. भारताने 3 ओव्हरआधीच हे आव्हान पूर्ण केलं. भारताचा हा या 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा विजय ठरला. भारताने यासह ही मालिका आपल्या नावावर केली. भारताने यासह मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडी मिळवली आहे.
टीम इंडियाच्या विजयात स्मृती मंधाना, शफाली वर्म, जेमीमाह रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या चौघींनी बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. शफाली आणि स्मृती सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आणि भारताचा विजय निश्चित केला. स्मृती आणि शफालीने 41 बॉलमध्ये 56 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर शफाली आठव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर आऊट झाली. शफालीने 19 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.
शफालीनंतर स्मृती मंधानाही आऊट झाली. स्मृती अर्धशतक ठोकण्याची संधी होती. मात्र स्मृती तसं करण्याआधीच इंग्लंडने तिला आऊट केलं. स्मृतीने 31 बॉलमध्ये 5 फोरसह 32 रन्स केल्या.
त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि जेमीमाह रॉड्रिग्स या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 48 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. हरमनप्रीत कौर भारताला विजयासाठी 10 धावा हव्या असताना बाद झाली. हरमनप्रीतने 25 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. त्यानतंर अमनज्योत कौर 2 धावा करुन आऊट झाली. तर जेमीमाह आणि रिचा घोष या जोडीने भारताला विजयी केलं. जेमीमाहने नाबाद 24 धावा केल्या. तर रिचा 7 धावांवर नाबाद परतली.
दरम्यान त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सोफी डंकले आणि कॅप्टन टॅमी ब्यूमोंट या दोघींचा अपवाद वगळता एकीलाही भारतीय गोलंदाजांसमोर 20 पेक्षा पुढे जाता आलं नाही. त्यामुळे भारताला इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 126 धावांवर रोखण्यात यश आलं. टीम इंडियाकडून अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतल्या. तर श्री चरणी आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. मात्र राधाने चरणीच्या तुलनेत चिवट बॉलिंग केली. त्यामुळे राधाला वूमन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टीम इंडिया मालिकेत 3-1 ने आघाडीवर
दरम्यान टीम इंडियाने या मालिका विजयासह अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. भारताने 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. भारताने याआधी इंग्लंडमध्ये 2006 साली एकमेव सामना जिंकत इतिहास घडवला होता. त्यानंतर आता भारताने मालिका जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 12 जुलै रोजी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे आयोजित करण्यात आला आहे.