‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘कहानी घर घर की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी गोसाईंने दोनदा लग्न केलं आणि दोन्ही वेळा तिचा घटस्फोट झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती लग्नाविषयी आणि लग्नात आलेल्या तिच्या वाईट अनुभवांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. शिवानीचं पहिलं लग्न वयाच्या 17 व्या वर्षी झालं होतं. हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर तिने 2011 मध्ये दुसरं लग्न केलं. फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर दोघांनी दोन महिन्यांतच लग्न केलं होतं. लग्नाच्या अवघ्या काही आठवड्यांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शिवानी म्हणाली, “लग्न करणं ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मला सर्वकाही चांगलं वाटलं होतं. तो सगळ्यांशी खूप चांगला वागत होता. त्याने माझ्यावरही विशेष प्रभाव पाडला होता. परंतु लग्नानंतर तो पूर्णपणे बदलला. त्याने आधी जे काही सांगितलं होतं, ते सर्व खोटं होतं. मी त्याला माझ्या पहिल्या लग्नाविषयी सर्वकाही सांगितलं होतं, परंतु त्याने माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या होत्या. माझ्या अवती-भवती जे घडत होतं, ते पाहून मी आजारी पडली होती.”
View this post on Instagram
A post shared by Shivani Gosain शिवानी गोसाईं (@shivanigosain)
“माझ्यावर तो प्रमाणापेक्षा जास्त हक्क गाजवत होता. मी कोणालाच एकटी भेटू शकत नव्हती. त्याने माझ्या चारित्र्यावरही संशय घेतला होता. मला अपशब्द सुनावले. हे सर्व माझ्या सहनशक्ती पलीकडे गेलं होतं. दुसऱ्या लग्नाच्या महिन्याभरातच मी घर सोडलं होतं. सुदैवाने मला काम मिळत गेलं आणि या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्यात मदत झाली. लग्नानंतर मला समजलं की त्याच्याकडे पैसेच नाहीत. त्याने ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं, ते पैसे परत घेण्यासाठी दारासमोर उभे राहिले. त्याने माझे दागिने मागितले. काही दिवसांनंतर त्याने माझी कार विकली होती. त्याने माझं शारीरिक शोषणही केलं होतं”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
याविषयी तिने पुढे सांगितलं, “तो माझ्या फोनमधील सर्व मेसेज वाचायचा. वॉचमनलाही पैसे देऊन माझ्याबद्दल माहिती घेत होता. त्याने एकदा मला सर्वांसमोर मारलं होतं. मी एका दगाबाज आणि पत्नीवर हात उचलणाऱ्याशी लग्न केलं होतं. त्याने माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. आता मला सिंगलच राहायचं आहे. मला फक्त माझ्या कामावर आणि कुटुंबीयांवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. लग्नाच्या बाबतीत मी कमनशिबी आहे. लग्नानंतर मला खूप वाईट अनुभव आला. मी लग्नाच्या विरोधात नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. पण मला माझ्या लग्नाचा खूप पश्चात्ताप आहे. आतासुद्धा माझ्याविरोधात क्रिमिनल केस सुरू आहे, ज्याबद्दल मी फार काही सांगू शकत नाही. माझ्यासाठी ते सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखं होतं.”