ग्लॅमरस भूमिका साकारून आणि रिअॅलिटी टीव्ही शोजमध्ये झळकून प्रसिद्धीझोतात आलेली पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल हुमायरा असगर तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. कराचीमधल्या घरात 32 वर्षीय हुमायरा मृतावस्थेत आढळल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. धक्कादायक बाब म्हणजे हुमायराचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. म्हणजेच काही आठवड्यांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारत येत नाही. ‘बिग ब्रदर’ या शोचा पाकिस्तानी व्हर्जन ‘तमाशा घर’मध्ये तिने भाग घेतला होता आणि त्यातूनच तिला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. परंतु ती तिच्या कुटुंबीयांपासून दुरावली होती. हुमायराच्या मृत्यूविषयी समजल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचा मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला आहे.
हुमायराच्या कुटुंबीयांना, विशेषकरून तिच्या भावाला आणि वडिलांना जेव्हा तिच्या मृत्यूविषयीची माहिती देण्यात आली, तेव्हा त्यांनी तिचा मृतदेह स्वीकारण्यास थेट नकार दिला. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा पोलिसांनी तिच्या भावाशी संपर्क साधला, तेव्हा तिच्या भावाने वडिलांशी संपर्क साधण्यास सांगितलं. हुमायराचे वडील डॉ. असगर अली हे निवृत्त आर्मी डॉक्टर आहेत. “आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी तिच्याशी सर्व संबंध तोडले आहेत. त्यामुळे तिच्या मृतदेहाचं तुम्हाला जे करायचंय ते करा. आम्ही ते स्वीकारणार नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी पोलिसांना दिली.
View this post on Instagram
A post shared by Humaira Asghar (@humairaaliofficial)
हुमायराचा मृतदेह स्वीकारून त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा तिच्या वडिलांची समजूत काढू, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतरही तिच्या वडिलांनी नकार दिल्यास आम्ही मृतदेहाला बेवारस ठरवू आणि दफन करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हुमायराच्या आईविषयी सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या अशा प्रतिक्रियेमुळे नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. “मी काल तिची एक मुलाखत पाहिली होती. त्यात ती तिच्या कुटुंबाविषयी खूप प्रेमाने बोलत होती. आता ते तिच्याशी असं वागतायत, यावर माझा विश्वासच बसत नाही”, असं एका युजरने लिहिलं.
हुमायराचा मृतदेह जून महिन्यापासून तिच्या राहत्या घरात तसाच पडून होता आणि कोणालाच त्याचा थांगपत्ता नव्हता. तिने काही महिन्यांचं घराचं भाडं भरलं नव्हतं. त्यामुळे कोर्टाची ऑर्डर घेऊन जेव्हा पोलीस तिच्या घरी आले, तेव्हा त्यांना तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. हुमायराने जवळपासू वर्षभरापासून घराचं भाडं भरलेलं नव्हतं.