महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर युती, आघाडी याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने सध्या राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच आता महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत लढणार का, या प्रश्नावर राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणितं आणि समीकरणं असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, तर कधी स्थानिक पातळीवर आघाड्या कराव्या लागतात, असे संजय राऊत म्हणाले.
लोकसभेला आम्हाला चांगले यश“अशा प्रकारच्या बातम्या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत. लोक असे विचारतात इंडिया आघाडीचे भविष्य काय? आम्ही जेव्हा सन्माननीय राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रात एक प्रचंड जल्लोष झाला त्याच्यानंतर अनेकांना प्रश्न पडला यापुढे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे भविष्य काय त्याच्यावर माझं उत्तर असं आहे इंडिया आघाडी जे तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाले होते. आम्ही एकत्र निवडणुका लढल्या, आम्हाला चांगले यश मिळालं.” असे संजय राऊतांनी नमूद केले.
महाविकास आघाडीतून कोणीही बाहेर पडलेलो नाही“लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही. ही खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अनेक नेत्यांसमोर व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीचा विषय हा राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी या संदर्भात आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे प्रामुख्याने आहेत. आम्ही विधानसभा निवडणुका लढलो. आम्ही महाविकास आघाडीतून कोणीही बाहेर पडलेलो नाही, आम्ही आजही त्याचे घटक आहोत आणि महाविकास आघाडी संदर्भात निर्णय एकत्र घेतले जातील”, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेसाठी स्थानिक पातळीवर वेगळ्या आघाड्या कराव्या लागतात“आता राहिला विषय महानगरपालिका निवडणुकांचा. या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की, महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील का? स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणितं आणि समीकरणं असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, तर कधी स्थानिक पातळीवर आघाड्या कराव्या लागतात”, असे संजय राऊत म्हणाले.
“मला जेव्हा याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा मी इतकंच सांगितलं की, आमच्या सगळ्यांवर जनतेचा दबाव आहे, जो आपण ५ तारखेला पाहिला असेल. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे, खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या, असा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील”, असेही संजय राऊतांनी म्हटले.