इंग्लंड दौऱ्यापासून कसोटी संघाची धुरा युवा शुबमन गिलच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. दोन सामने झाले असून त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील हा तिसरा सामना आहे. हा सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. असं असताना शुबमन गिलचं नशिब तिसऱ्यांदा फुटकं निघालं आहे. त्याने टॉस गमवण्याची हॅटट्रीक साधली आहे. सलग तीन सामन्यात शुबमन गिलने नाणेफेकीचा कौल गमावला आहे. पहिल्यांदा लीड्स कसोटी सामन्यात, त्यानंतर एजबेस्टन कसोटीतही नाणेफेक गमावली होती. लीड्सवर प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यानंतर एजबेस्टनमध्ये प्रथम फलंदाजीच निमंत्रण मिळालं. मात्र लॉर्ड्सवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली आहे. फक्त या मालिकेतच नाही तर भारतीय संघ मागच्या काही काळापासून सर्व प्रकारच्या फॉर्मेटमध्ये नाणेफेकीचा कौल गमवताना दिसत आहे. आतापर्यंत भारताच्या पुरुष आणि महिला संघाने 17 नाणेफेकीचे कौल गमावले आहेत.
भारतीय पुरुष संघाने या वर्षी म्हणजेच 2025 या वर्षात सूर्यकुमारच्या नेतृत्वात इंग्लंडविरूद्ध टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला होता. त्यानंतर महिला संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मे 2025 मध्ये शेवटचा नाणेफेकीचा कौल जिंकला होता. म्हणजेच 2025 या वर्षात दोन्ही संघांनी खेळलेल्या 19 सामन्यात आतापर्यंत फक्त 2 वेळा नाणेफेक जिंकली आहे. तर भारतीय पुरुष संघाने सर्व प्रकारच्या फॉर्मेटमध्ये सलग 13व्यांदा नाणेफेक गमावली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मैदानाची स्थिती पाहून निर्णय घेता येतो. त्यामुळे संघाच्या रणनितीत नाणेफेकीचा कौलही तितकाच महत्त्वाचा आहे. आता उर्वरित दोन सामन्यातरी शुबमन गिलला नशिबाची साथ मिळेल का? हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
भारताने नाणेफेक गमवल्याने प्रथम गोलंदाजी करत आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह असल्याने भारताचे बळ वाढलं आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सावध सुरुवात केली. जॅक क्राउली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. पण ही भागीदारी फोडण्यात नितीश रेड्डीला यश आलं. त्याने बेन डकेटची विकेट काढून पहिला धक्का दिला. त्यानंतर त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झॅक क्राउलीला बाद केलं.