आंबेगाव तालुक्यात एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला. गंभीर जखमी केले असतानाही न घाबरता त्यांनी दगड उचलून बिबट्यावर उघारला आणि त्याला पळवून लावत स्वत:चा जीव वाचवला. बिबट्यासोबत झालेल्या झटापटीत त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
आंबेगाव तालुक्यातील खडकी गावच्या पांढरी वस्तीवर काळुबाई मंदिराजवळ गणेश सयाची वाबळे (55) राहतात. घराशेजारील शेतात लावलेली गवारी तोडण्यासाठी आली आहे का, हे पाहण्यासाठी सकाळी सात वाजता शेतात गेले होते. खाली वाकून गवारीची झाडे ते पाहत असतानाच अचानक समोरून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. गणेश वाबळे खाली वाकलेले असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर बिबट्याने गंभीर जखमा केल्या आहेत. डोक्याच्या मधोमध मोठी जखम झाली आहे. अशा परिस्थिती त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना करत शेतात पडलेला दगड उचलला व बिबट्याच्या दिशेने भिरकावला. आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या तेथून पळू गेला. रक्तबंबाळ अवस्थेत ते घरी आले असता त्यांच्या मुलाने त्यांना तत्काळ मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
खडकी परिसरात झालेल्या बिबट्याच्या या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश वाबळे हे बिबट्याच्या हल्ल्यात थोडक्यात बचावल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. या भागात तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार वन खात्याने घटनास्थळी पिंजरा लावला आहे.