जळगाव जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पांढरे सोन समजल्या जाणाऱ्या कापसाच्या लागवडीत तब्बल 25 टक्क्यांनी घट झाली आहे. कापसाचे एकूण पाच लाख 46 हजार हेक्टर इतके क्षेत्रापैकी, मागील वर्षी पाच लाख सहा हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली होती. यंदा केवळ चार लाख सात हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली असून कापूस लागवडीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून कापसाला भाव नाही दुसरीकडे लागवडीचा खर्च निघेना, अपेक्षित उत्पन्न नसल्याने शेतकरी दुसर्या पिकाकडे वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मक्याला चांगला भाव मिळत असल्याने मका लागवडीकडे यंदा शेतकऱ्यांचा मोठा कल असून त्यामुळेच कापसाची पेरणी टाळत मक्याच्या लागवडीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
मक्याचे क्षेत्र का वाढले?
मक्याला सध्या चांगला बाजारभाव आहे. तर कडबा, चारा म्हणून मक्याला मोठी मागणी असते. त्याचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. मक्याचे पीक साधारणपणे 20 दिवसांत तयार होते. शेतकरी एकाच वर्षात एकापेक्षा अधिक पिके घेऊ शकतात. कापसाच्या तुलनेत मक्याला पाण्याच्या पाळ्या सुद्धा कमी लागतात. कापसासारखे नगदी पीक सोडून शेतकरी त्यामुळे मक्याकडे वळाल्याचे दिसून येते.
कापसाकडे का फिरवली पाठ?
कापसाला मेहनत, खर्च आणि पाणी या गोष्टी अधिक लागतात. लहरी पाऊस, जमिनीतील पाण्याची पातळी कमी होणे यामुळे कापसासाठी पाण्याचे नियोजन करणे अवघड झालेले आहे. तर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव ही मोठी अडचण आहे. कापसासाठी अधिकची मजूरी, खर्च, खतं आणि किटकनाशकांवर खर्च होतो. तर बाजार भावासाठी ताटकळत थांबावे लागते. योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांना कापसाकडे पाठ फिरवली आहे.
यावर्षी आतापर्यंत तब्बल 1 लाख 61 हजार क्षेत्रावर म्हणजेच 174 टक्के एवढी मक्याची लागवड झाली असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे
कापूस आणि ज्वारी पिकाच्या लागवड क्षेत्रात घट झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस लागवडीचे क्षेत्र 25 टक्क्यांनी घटले आहे अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे
जळगाव जिल्ह्यातील सात लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रापैकी सहा लाख 41 हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली असून जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 87% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
कापसाचे पाच लाख 46 हजार हेक्टर इतके सरासरी क्षेत्र, त्यापैकी चार लाख सात हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे कापसाची 75 टक्के लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी पाच लाख सहा हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली होती
मक्याचे सरासरी क्षेत्र 92 हजार 650 इतकी आहे मात्र यावर्षी तब्बल एक लाख 61 हजार क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे, मका पेरणीचे प्रमाण 174 टक्के इतकी आहे