Team India चा बांगलादेश दौरा रद्द झाल्यानंतरही ऑगस्टमध्ये खेळताना दिसणार विराट-रोहित? BCCI करते वेगळा प्लॅन
esakal July 10, 2025 10:45 PM

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताला पुढच्या महिन्यात (ऑगस्ट) बांगलादेशचा दौरा करायचा होता. पण हा दौरा सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे हा दौरा स्थगित करण्यात आला आहे, याबाबत दोन्ही बोर्डांकडून माहिती देण्यात आली आहे.

तसेच ही मालिका आता सप्टेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या भारताला वनडे मालिका थेट ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळायची आहे. त्यामुळे भारतासाठी ऑगस्ट महिन्यातील कालावधी रिकामा झाला आहे. त्यामुळे आता या कालावधीत बीसीसीआय दुसरी मालिका घेण्याचा विचार करत आहे.

मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी२० मालिका खेळण्याची शक्यता आहे. या मालिका आयसीसीच्या फ्यूचर टूर प्रोग्राम (FTP) भाग नाही. पण ऑगस्टमध्ये दोन्ही संघांसाठी विंडो ओपन आहे. त्या कालावधीत वनडे आणि टी२० मालिका खेळवली जाऊ शकते.

श्रीलंकेमध्ये जुलै-ऑगस्ट दरम्यान श्रीलंका प्रीमियर लीग खेळवली जाणार होती. पण ही स्पर्धाही सध्या स्थगित झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेकडेही या कालावधीत रिकामा वेळ आहे. त्यामुळे श्रीलंका संघही या कालावधीत भारतीय संघासोबत खेळू शकतो.

तथापि, अद्याप श्रीलंका आणि भारत यांच्यातील वनडे आणि टी२० मालिकांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. पण श्रीलंकेच्या स्थानिक मीडिया न्यूजवायरच्या रिपोर्टनुसार सध्या बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात या मालिकांच्या आयोजनाबाबत चर्चा सुरू आहे. त्यांच्यात या मालिकांच्या तारखांबाबत चर्चा सुरू आहे.

सध्या श्रीलंका बांगलादेशविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. या दोन संघात याआधी कसोटी मालिका झाली, जी श्रीलंकेने १-० फरकाने जिंकली, त्यानंतर वनडे मालिकाही श्रीलंकेने २-१ अशा फरकाने जिंकली असून आता टी२० मालिका १० जुलैपासून खेळणार असून १६ जुलैला बांगलादेशचा श्रीलंका दौरा संपणार आहे. त्यामुळे यानंतर श्रीलंका ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. ऑगस्टच्या अखेरीस श्रीलंकेला झिम्बाब्वे दौरा करायचा आहे.

भारतीय संघाबाबत सांगायचे झाले, तर सध्या भारताचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असून दोन सामने पूर्ण झाले असून तीन सामने बाकी आहेत. ही ५ सामन्यांची मालिका ४ ऑगस्टपर्यंत संपेल. त्यानंतर भारताला थेट आशिया कप टी२० स्पर्धा खेळायची आहे. त्यापूर्वी कोणतीही मालिका भारतीय संघ खेळणार नाहीये.

IND vs ENG: भारताच्या पोरींनी इतिहास घडवला! इंग्लंडच्या मैदानात जिंकली T20 मालिका; टॉपर ठरली स्मृती मानधना

या गोष्टी लक्षात घेता ऑगस्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्याचा कालावधी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांकडे रिकामा आहे. त्यामुळे भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर या कालावधीत जाऊ शकतो.

याआधी गेल्यावर्षी श्रीलंकेत वनडे आणि टी२० मालिका भारतीय संघ खेळला होता. त्यावेळी भारताने वनडे मालिका गमावली होती, पण टी२० मालिका जिंकली होती.

दरम्यान, जर भारत आणि श्रीलंका यांच्यात ऑगस्टमध्ये वनडे मालिका खेळवण्यात आली, तर त्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसू शकतात. त्यांनी कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी ते वनडेमध्ये सक्रिय आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.