टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा तिसऱ्या सामन्यासाठी विश्वास दुणावलेला आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. या दरम्यान टेस्ट टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडमध्ये पोहचला आहे. त्यामुळे रोहित इंग्लंडमध्ये काय करतोय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
क्रिकेट चाहत्यांचं लक्ष इंडिया-इंग्लंड सामन्याकडे असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत अभिनेता बॉबी देओल पाहायला मिळत आहे. बॉबी देओलने रोहित शर्मासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मी टीम इंडियाला सपोर्ट करत असल्याचा उल्लेख बॉबीने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.
रोहितने आजपासून 2 महिन्यांआधी 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. तेव्हापासून रोहित रिलॅक्स मोडमध्ये पाहायला मिळत आहे. रोहित आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहे. रोहित आता इंग्लंडमध्ये पोहचला आहे. त्यामुळे रोहित लॉर्ड्समध्ये सुरु असलेला सामना पाहण्यासाठी जाणार की नाही? याबाबत काहीही निश्चित नाही.
रोहित शर्मा याने टीम इंडियाचं 67 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रोहितने 116 डावांमध्ये 40.58 च्या सरासरीने आणि 57.06 स्ट्राईक रेटने 4 हजार 301 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 18 अर्धशतकं, 12 शतकं आणि 1 द्विशतक झळकावलं आहे. तसेच रोहितने याआधीच टी 20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे रोहित आता एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे.
बॉबी आणि रोहित
दरम्यान इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत 64 ओव्हरनंतर 200 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि अनुभवी जो रुट ही जोडी खेळत आहे. तर टीम इंडियाने बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पोप आणि हॅरी ब्रूक या 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.