शिकाऱ्याला वाटला साधा दगड, किंमत तब्बल 34 कोटी, कुठून आला दगड?; काय आहे खासियत?
GH News July 13, 2025 09:08 PM

जगातील प्रसिद्ध लिलाव कंपनी साउथबायज एका दगडाचा लिलाव करत आहे. हा साधा दगड नसून एक उल्कापिंड आहे. याचे नाव NWA16788 असे असून त्याचे वजन 25 किलो आहे. हा मंगळ ग्रहाचा पृथ्वीवर सापडलेला सर्वात मोठा तुकडा आहे. हा तुकडा 2023 मध्ये सहारा वाळवंटात सापडला होता. याची अंदाजे किंमत 34 ते 50 कोटी रुपये आहे.

हा दगड पृथ्वीवर कसा आला?

साउथबायज कंपनीच्या महितीनुसार, मंगळ ग्रहावरील एक मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळला. त्याचा एक तुकडा तुटून पृथ्वीच्या सहारा वाळवंटात पडला होता. हा दगड सुमारे 2.25 कोटी किलोमीटर प्रवास करून तो पृथ्वीवर आला आहे. सर्वात आधी हा उल्कापिंड मंगळाच्या वातावरणातून बाहेर पडला, त्यानंतर पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करुन तो सहारा वाळवंटात पडला. नोव्हेंबर 2023 मध्ये उल्कापिंड शोधणाऱ्या एका शिकाऱ्याला तो नायजरच्या वाळवंटात सापडला होता.

दगडाचा हा तुकडा पृथ्वीवर सापडलेला सर्वात मोठा मंगळावरील सर्वात मोठा उल्कापिंड आहे. हा आधी सापडलेल्या एका सर्वात मोठ्या तुकड्यापेक्षा 70% जड आहे. तसेच पृथ्वीवर सध्या असलेल्या मंगळावरील खडकांपैकी या दगडाचे वस्तूमान 7% आहे. हा दगड 38 सेमी लांब, 28 सेमी रुंद आणि 15 सेमी जाड आहे. या दगडाची रासायनिक रचना 1976 मध्ये मंगळावर पोहोचलेल्या वायकिंग अंतराळयानाच्या नमुन्यांशी जुळत असल्याची माहिती समोर आली आहे.

या दगडाचे रासायनिक स्वरूप काय आहे?

हा दगड ऑलिव्हिन-मायक्रोगॅब्रिक शेरघ्टाइट खडक म्हणून ओळखला जातो. जेव्हा मंगळाचा मॅग्मा थंड होतो, त्यानंतर स्फटिकीकरण प्रक्रियेतून हा असा खडक तयार होते. या दगडात पायरोक्सिन आणि ऑलिव्हिन नावाची खनिजे आढळली आहेत. हा खडक पृथ्वीवर कधी कोसळला याची नेमकी माहिती समजू शकलेली नाही. रोममधील इटालियन स्पेस एजन्सीच्या प्रदर्शनात हा खडक समोर आला होता, आता तो लिलावासाठी न्यू यॉर्कला पाठवण्यात आला आहे.

हा दगड मौल्यवान का आहे?

साउथबायज कंपनीच्या म्हणण्यांनुसार, पृथ्वीवर आढळणाऱ्या 77 हजारांवरून अधिक उल्कापिंडांपैकी फक्त 400 उल्कापिंड मंगळावरील आहेत. त्यापैकी हा सर्वात मोठा आहे. हा दगड वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वाचा आहे. यामुळे मंगळाच्या आतील रचना, भूगर्भीय इतिहास आणि तेथील वातावरण समजून घेण्यासाठी मदत करू शकते. त्यामुळे त्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.