तेव्हा ठाकरे मोदींचे बूट चाटत होते का? रामदास कदमांचा हल्लाबोल! म्हणाले वेळ आल्यावर…
GH News July 13, 2025 09:08 PM

आपले सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल या भीतीपोटी एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाहांना भेटले आहेत, असं बोचरं भाष्य खासदार संजय राऊतांनी ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरातून केले आहे. त्यावरच आता शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खरपूस शब्दांत टीका केली आहे. काहीही झालं तरी यावेळी मुंबई महापालिकेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचाच भगवा फडकणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते, तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बूट चाटत होते का? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

मातोश्रीवर बसून मंत्रालयाचे कामकाज

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात राज्याचे मंत्रालय त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी आणून ठेवले होते. ते अडीच वर्षांमध्ये फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले होते. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून मंत्रालयाचे कामकाज केले. उद्धव ठाकरेंनी मंत्रालय आपल्या मातोश्रीवर आणलं होतं, यावर त्यांनी बोललं पाहिजे, अशी टाका रामदास कदम यांनी केली.

त्यावेळी ठाकरे मोदींचे बूट चाटत होते का?

ठाकरे गट भाजपाला बदनाम करत आहे. तुमचे मालक (संजय राऊत) प्रत्येक सभेमध्ये एकनाथ शिंदे मोदीजींचे बूट चाटायला दिल्लीला गेले होते, असे म्हणतात. पण मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिल्लीला घेऊन गेले होते. त्यावेळी अजित पवार यांच्यासह सगळ्या पक्षाच्या लोकांना केबिनमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकटेच आतमध्ये गेले होते. तेव्हा उद्धव ठाकरे मोदीजींचे बूट चाटत होते का? असा घणाघाती सवालही रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांना केला.

काहीही झालं तरी मुंबई पालिकेवर…

मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून उत्तर भारतीय, भाजपाच्या लोकांना बदनाम करण्याचे काम चालू केलेले आहे. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त महानगरपालिका आहे. उत्तर भारतीयांना आणि भाजापला बदनाम करण्याशिवाय महानगरपालिका कदाचित मिळणार नाही असं त्यांना वाटतंय, असा खोचक टोला रामदास कदम यांनी ठाकरे गटाला लगावला. तसेच मी दाव्याने सांगतो की मुंबई महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचाच भगवा फडकणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

उद्धव ठाकरे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजतायत

उद्धव ठाकरेंनी हातामध्ये रुद्राक्ष बांधले होते. आता ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत. ते स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी दिल्लीमध्ये आपल्या काही माणसांना पाठवायचे. मला याबाबत माहिती आहे. पण मी यावर बोलणार नाही.पंधरा दिवसांच्या आधी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना भेटायला दिल्लीमध्ये कोण कोण गेलं होत? तिथे काय प्रस्ताव ठेवला? याची सगळी माहिती आली आहे.वेळ आली तर त्यावरही मी बोलणार आहे, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.