विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. जळगाव महापालिकेतील ठाकरे गटाचे दोन माजी महापौरांसह 13 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी महापौर नितीन लड्डा यांच्या नेतृत्वात हे सर्वजण भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज या नगरसेवकांची भाजपप्रवेशाच्या तारखेबाबत महत्वाची बैठक पार पडली.
जळगावात शिवसेना ठाकरे गटाचे 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून आज भाजप प्रवेशाबाबत नगरसेवकांची बैठक पार पडली. माजी महापौर व शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन लढ्ढा यांच्या फॉर्म हाऊसवर ही बैठक झाली. या बैठकीला सर्व 13 नगरसेवक हजर होते. या नगरसेवकांच्या बैठकीमुळे जळगावात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र भाजपप्रवेशाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या या बैठकीला भाजपचे आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. प्रवेशाबाबत अद्याप काही ठरलेले नाही, आमचे नेते सुरेश दादा जैन यांच्याशी चर्चा झाली आहे, भाजप पक्ष प्रवेशाबाबतचा त्यांचा निर्णय अंतिम राहील असे माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी खासगीत बोलताना सांगितले.
नितीन लढ्ढा यांनी सुरेश जैन यांनी निर्णय दिल्यानंतर प्रवेशाची तारीख निश्चित होईल असे विधान केले आहे. त्यामुळे आता माजी मंत्री सुरेश जैन यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर या नगरसेवकांचा भाजपप्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जैन यांच्या निर्णयाकडे या 13 नगरसेवकांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी जर हा पक्ष प्रवेश झाला तर हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे, तर दुसरीकडे जळगावात भाजपची ताकद वाढणार आहे, ज्याचा फयदा त्यांना महापालिका निवडणुकीसाठी होऊ शकतो. त्यामुळे हा पक्षप्रवेश भाजपसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.