पराभवानंतर शुबमन गिलने मनातलं सांगितलं, अभिमान वाटतो असं सांगत काढले चिमटे
GH News July 15, 2025 01:06 AM

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. पण दुसऱ्या डावात 193 धावांचं आव्हान गाठताना नांगी टाकली. आघाडीचे सर्व फलंदाज फेल गेले. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि शेपटाच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. त्यामुळे पराभवाचं अंतर काही अंशी कमी झालं. भारताने तिसरा गमावल्याने इंग्लंडने या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतावर उर्वरित दोन सामन्यात दडपण वाढलं आहे. भारताला या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी चौथा कसोटी सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात भारतावर दडपण असणार यात काही शंका नाही. या पराभवानंतर शुबमन गिलने सुरुवातीला अभिमान व्यक्त केला. त्यानंतर आपल्या मनातली खंत बोलून दाखवली.

कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘खूप अभिमान आहे. पाच दिवसांच्या कठीण क्रिकेटमध्ये आणि शेवटच्या सत्रापर्यंत शेवटच्या विकेटपर्यंत आणि प्रयत्नांचा प्रचंड अभिमान आहे. मी पाठलाग करण्याबद्दल खूप आत्मविश्वासू होतो. भरपूर फलंदाजी शिल्लक असताना मी खूप आत्मविश्वासू होतो. परंतु इंग्लंड ज्या पद्धतीने आक्रमण करत राहिला, त्यामुळे आम्हाला आमच्या टॉप-ऑर्डरमध्ये कदाचित दोन-तीन 50 धावांच्या भागीदारी करायच्या होत्या, आम्ही ते करू शकलो नाही आणि ते आमच्यापेक्षा चांगले खेळले.’

‘जोपर्यंत एक फलंदाज फलंदाजी करत आहे तोपर्यंत नेहमीच आशा असते. कारण लक्ष्य मोठे नव्हते आणि एक 50-60 धावांची भागीदारीने सामन्यात परतू वाटत होतं. जडेजा खूप अनुभवी आहे आणि त्याला कोणताही संदेश देऊ इच्छित नव्हतो. मला वाटते की तो शेपटाच्या फलंदाजांसह खरोखर चांगली फलंदाजी करत होता आणि मला फक्त त्याने आणि टेल-एंडर्सनी शक्य तितक्या वेळ फलंदाजी करावी अशी इच्छा होती.’ असंही कर्णधार शुबमन गिल याने सांगितलं.

‘आज सकाळीही त्यांनी ज्या पद्धतीने योजना आखल्या. आम्हाला 50 धावांची भागीदारी अपेक्षित होती आणि जर आम्हाला वरच्या क्रमात 50 धावांची भागीदारी मिळाली असती, तर आमच्यासाठी गोष्टी सोप्या झाल्या असत्या. कधीकधी, मालिकेचा स्कोअरकार्ड तुम्ही किती चांगले खेळला आहात हे दर्शवत नाही. मला वाटते की आम्ही खरोखर चांगले क्रिकेट खेळलो आणि मला वाटते की येथून ही मालिका आणखी रोमांचक होणार आहे.’, असंही गिल पुढे म्हणाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.