रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धादरम्यान युक्रेनमध्ये मोठी उलथापालथ झाली. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी उपपंतप्रधान युलिया स्विरिडेन्को यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. युलिया डेनिस श्मिहल यांची जागा घेतली आहे. डेनिस हे 2020 पासून पंतप्रधानपदावर विराजमान होते, मात्र आता त्यांच्या जागी युलिया स्विरिडेन्को या पदभार सांभाळणार आहेत.
युरो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, आज(14 जुलै) झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी युलिया या पंतप्रधानपदाची सुत्रे स्वीकारणार आहेत अशी घोषणा केली. तसेच त्यांनी सांगितले की, आम्ही कार्यकारी पदांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी बदल घडण्याची शक्यता आहे.
युलिया स्विरिडेन्को कोण आहेत?
युलिया स्विरिडेन्को या 39 वर्षीय महिला नेत्या असून त्या झेलेन्स्की जवळच्या मानल्या जातात. शिक्षण पूर्ण केल्यानंतर युलियाने यांनी राजकारणात प्रवेश केला.2008 मध्ये त्यांनी कीव विद्यापीठातून डॉक्टर ऑफ इकॉनॉमिक्सची पदवी घेतलेली आहे. त्या युक्रेनमध्ये आघाडीच्या अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात. खनिज करारांबाबत अमेरिकेसोबत बोलणी करण्याची जबाबदारी झेलेन्स्की यांनी त्यांच्यावर दिली होती. 2021 पासून त्या उपपंतप्रधानपद सांभाळत आहेत.
युलिया यांना पंतप्रधानपद का देण्यात आले?
युद्ध सुरु असल्यामुळे सरकारमध्ये कार्यकारी बदल होऊ शकले नव्हते. तसेच झेलेन्स्की यांना डेनिस श्मिहल यांचा पर्यायी उमेदवार सापडला नाही. युलिया या उपपंतप्रधान होत्या, तसेच त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. त्यामुळे युलिया यांना बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांच्याकडे पंतप्रधानपद देण्यात आले आहे.
याचे आणखी एक कारण म्हणजे, रशिया सतत युक्रेनवर हल्ले करत आहे. त्यामुळे युक्रेनला अमेरिकेच्या पाठिंब्याची गरज आहे. पाठिंब्यासाठी अमेरिकेशी बोलणी करण्याची जबाबदारी आता युलिया यांच्यावर दिली जाणार आहे. त्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
झेनलेस्की यांनीयुलिया यांच्या नावाची घोषणा केली असली तरी त्यांच्या नावाला युक्रेनियन संसदेची मान्यता आवश्यक आहे. आता संसदेची बैठक होईल आणि त्यात युलिया यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, युलिया यांचे पहिले मिशन अमेरिकेशी बिघडत चाललेले संबंध सुधारण्याचे असेल. सध्या युक्रेनचा अमेरिकेत कोणताही राजदूत नाही. हा राजदूत नेमण्यासाठी युलिया यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.