सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या प्रकरणाची आज सुनावणी झाली नाही. सर्वोच्च न्यायालयाने आजची सुनावणी ऐकण्यास नकार दिला, हे प्रकरण आता निकाली काढायचे असल्याचे खंडपीठाने सांगितले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे लवकर तारीख द्यावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली. त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली, तर सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाचा निकाल लागू शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या विधानामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, “आम्हाला या मॅटरचं शोक्ष मोक्ष लावायचा आहे.” केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष चिन्हासंदर्भात दिलेला निर्णय चुकीचा आणि असंवैधानिक वाटत असल्याने त्याची त्वरित सुनावणी व्हावी अशी मागणी एका इंटरव्हेंशन ॲप्लिकेशनद्वारे करण्यात आली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मूळ याचिकेसोबतच याची सुनावणी घेतली जाईल असे मत व्यक्त केले. संजय राऊत यांनी धनुष्यबाणावर शिंदे गटाचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला दिले, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाने विधीमंडळातील बहुमताचा आधार घेतला, पण त्यांचे अनेक आमदार आणि खासदार पराभूत झाले, त्यामुळे तो आधार कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे अशी मागणी पक्ष करत आहे.