लॉर्ड्स येथील ऐतिहासिक मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडने टीम इंडियाला फक्त २२ धावांनी पराभूत केले. कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी जसप्रीत बुमराह याने घेतलेल्या ५ विकेट्स, केएल राहुल याचे शतक आणि रवींद्र जडेजा याचे दोन्ही डावातील आक्रमक अर्धशतके पुरेसे ठरले नाही. टीम इंडियाच्या पराभवाचे पोस्टमॉर्टेम केले तर अनेक वेगवेगळी कारणे समोर येऊ शकतात. परंतु भारतीय कर्णधार शुभमन गिल याने दोन चुकांवर बोट ठेवत पराभवाचे विश्लेषण केले.
लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात इंग्लंडकडून टीम इंडियाला १९३ धावांचे सोपे लक्ष्य दिले होते. त्याला उत्तर देताना चौथ्या दिवशी भारताने ४ गडी गमावून केवळ ५८ धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या दिवशी विजयासाठी भारताला १३५ धावांची गरज होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये भारताने आणखी चार गडी गमावून आपला पराभव निश्चित केला. परंतु त्यानंतर रवींद्र जडेजा सोबत जसप्रीत बुमराह आणि नंतर मोहम्मद सिराज यांनी चांगली भागिदारी करुन भारताच्या आशा पल्लवीत केल्या होत्या.
अवघ्या २२ धावांनी झालेल्या पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल निराश झाला. त्याने या पराभवाच्या कारणांवर उघडपणे वक्तव्य केले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार गिलने दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. जे या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवात महत्त्वाचे ठरले. गिल म्हणाला, आम्ही चौथ्या दिवशी एक तास आणि पाचव्या दिवशी एक तास चांगला खेळलो नाही. टॉप ऑर्डरने अजिबात चांगली कामगिरी केली नाही. टॉप ऑर्डरने किमान ३०-४० धावा जास्त करायला हव्या होत्या. या मालिकेत पहिल्यांदाच टॉप ऑर्डर अपयशी ठरली.
कर्णधार गिल याने दुसरे वक्तव्य करताना सांगितले की, सामन्यात टीम इंडियाने एकूण ६३ धावा अतिरिक्त म्हणून दिल्या. त्यापैकी ३६ धावा बायच्या होत्या. दुसऱ्या डावात फक्त २५ धावा बायमधून आल्या. भारताचा पराभव २२ धावांमुळे झाला. याउलट इंग्लंडने दोन्ही डावात फक्त ३० अतिरिक्त धावा दिल्या. ज्यामध्ये फक्त ३ धावा बायमधून आल्या. गिल याने यष्टीरक्षकाचा उल्लेख न करता सांगितले, आम्ही क्षेत्ररक्षणात सुधारणा केली आहे, तरीही काही अनावश्यक चुकाही केल्या. आम्ही काही चौकार थांबवू शकलो असतो. तरीही लक्ष्य साध्य करण्यासारखे होते.