बांगलादेशने श्रीलंकेला त्यांच्यात भूमीत टी20 मालिकेत 2-1 ने धूळ चारली आहे. तिसरा आणि निर्णायक टी20 सामना बांग्लादेश 8 गडी राखून जिंकला. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला होता आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण बांगलादेशने अचूक गोलंदाजीचं प्रदर्शन घडवलं आणि 20 षटकात 132 धावांवर रोखलं. श्रीलंकेच्या हातात विकेट होत्या पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. श्रीलंकेने विजयासाठी 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तन्झिद हसन तमिम… त्याने 47 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकार मारत नाबाद 73 धावांची खेळी केली. तर लिटन दासने 32, तर तोहिद हृदोयने नाबाद 27 धावंची खेळी केली. बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्धचा हा पहिलाच टी20 मालिका विजय आहे. या विजयानंतर बांगलादेशने काही नागिन डान्स केला नाही. पण बांगलादेशच्या खेळाडूंनी मागच्या काही स्पर्धांमध्ये विजयानंतर नागिन डान्स जल्लोष केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये यावरून आक्रमकता दिसून आली आहे.
श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका याने सांगितलं की, ‘माझा विचार होता की प्रथम फलंदाजी करावी आणि चांगला स्कोअर मिळवावा आणि त्याचे रक्षण करावे. आम्हाला प्रेमदासा स्टेडियमवर धावा रोखायला आवडते. पण मी खेळपट्टी चुकीची समजली. आम्ही विशेषतः पहिल्या हाफमध्ये आमच्या फलंदाजीने चांगले कामगिरी करू शकलो असतो. आम्हाला अधिक जबाबदारी घेण्याची गरज होती. सध्या, हे आमच्याकडे असलेले सर्वोत्तम संयोजन आहे आणि आम्हाला विश्वचषकापूर्वी सुधारणा करावी लागेल. हे निराशाजनक आहे पण हे कोणत्याही संघासोबत होऊ शकते परंतु आम्ही पुनरागमन करण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.’
पण मेहदी हसनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने 4 षटकात एक निर्धाव षटक टाकलं. तसेच 11 धावा देत 4 गडी बाद केले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेची धावगती मंदावली आणि त्याचा फायदा बांगलादेशला झाला. मेहदी हसन म्हणाला की, ‘मला श्रीलंकेतील खेळपट्टी माहित होती. गेल्या दोन सामन्यांमध्ये चेंडू फिरत होता म्हणून मी माझ्या लाईन्स आणि लेन्थवर टिकून राहिलो. नवीन चेंडूत थोडा फिरकी होती म्हणून मी तो चांगल्या क्षेत्रात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने, मी यशस्वी झालो.’
तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने 7 विकेट आणि 6 चेंडू राखून जिंकला होता. त्यानंतर दुसर्या सामन्यात बांगलादेशने कमबॅक केलं आणि श्रीलंकेला 83 धावांनी पराभूत केलं. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णयाक होता. मात्र या सामन्यात श्रीलंकेला विजयश्री खेचून आणण्यात अपयश आलं.