ENG vs IND : मँचेस्टरमध्ये टीम इंडियाचं काय होणार? इतक्या वर्षांची प्रतिक्षा कायम
GH News July 17, 2025 01:07 AM

भारतीय क्रिकेट संघाला लॉर्ड्समध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. शेवटच्या सत्रापर्यंत गेलेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणी भारताचा अवघ्या 22 धावांनी पराभव झाला. इंग्लंडने भारताला 193 धावांचा पाठलाग करताना 170 धावांवर रोखलं. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. आता उभयसंघातील चौथा सामना हा 23 जुलैपासून एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे होणार आहे. भारतासमोर या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-2 ने बरोबरी साधण्याचं आव्हान असणार आहे. मात्र भारताला या मैदानात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकही सामना जिंकता आलेला नाही. भारताची या मैदानातील गेल्या 89 वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा कायम आहे.

ओल्ड ट्रॅफर्डमधील टीम इंडियाचे आकडे

ओल्ड ट्रॅफर्डमधील टीम इंडियाची आकडेवारी फार चिंताजनक आहे. टीम इंडियाने या मैदानात 1936 पासून एकूण 9 कसोटी सामने खेळले आहेत. भारताला या 9 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. भारताला या 4 पैकी 2 सामन्यांमध्ये 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. तर 5 सामने अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं आहे.

काही चांगल्या आठवणी

टीम इंडियासाठी या मैदानातील काही चांगल्या आठवणी आहेत. टीम इंडियाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने वयाच्या 17 व्या वर्षी याच मैदानात पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं होतं. सचिनने 1990 साली इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात नाबाद 119 धावा केल्या होत्या. सचिनच्या या शतकी खेळीमुळे भारताला हा सामना अनिर्णित राखता आला होता. सचिनने या खेळीसह क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली होती. सचिनला या कामगिरीसाठी तेव्हा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

टीम इंडिया कमबॅक करणार?

भारतीय फलंदाजांनी इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. मात्र तिसऱ्या सामन्यात अपवाद वगळता प्रमुख फलंदाजांनी घोर निराशा केली. तिसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजा आणि केएल राहुल या दोघांनी झुंज दिली. तर इतर फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. त्यामुळे टीम इंडिया 193 धावाही करु शकली नाही.

दरम्यान मालिकेत भारतीय संघ 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. भारताला ही मालिका जिंकायची असेल तर उर्वरित 2 सामने जिंकावे लागतील. मात्र टीम इंडियाने किमान चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी करावी, इतकी अपेक्षा भारतीय चाहत्यांना असणार आहे. त्यामुळे आता भारतीय संघ चौथ्या सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.