गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि सीरियामध्ये तणावाचे वातावरण आहे. या दोन्ही देशांमध्ये झालेली युद्धबंदी अवघ्या 48 तासांतच मोडण्याची शक्यता आहे. कारण, सीरियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने सुवेदा शहरात पुन्हा सैन्य तैनात करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता युद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण सुवेदामध्ये ड्रुझ लोकांची संख्या जास्त आहे, या भागात सैनिक तैनात करण्यास इस्रायलने विरोध केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सीरियन प्रशासनाने ड्रुझ लोकांची दाट लोकवस्ती असलेल्या सुवेदामध्ये पुन्हा सैन्य पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शत्रूच्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता यामुळे पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इस्रायल 48 तासांनंतर हल्ला करणार?
टाईम्स ऑफ इस्रायलने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, इस्रायल संपूर्ण घटनेवर 48 तास लक्ष ठेवणार आहे. जर सीरियन सरकार सुवेदामध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले तर इस्रायल हल्ला करणार असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, इस्रायलने दोन दिवसांपूर्वी सीरियावर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे सीरियाचे संरक्षण मंत्रालय आणि लष्कराचे मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी केली होती, मात्र आता हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीरियाने युद्धबंदी तोडल्याचा इस्रायलचा आरोप
इस्रायलकडून सीरियाने युद्धबंदी तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, ‘युद्धबंदी असूनही, बेदुइन समुदायाचे लोक ड्रुझवर हल्ला करत आहेत. हे युद्धबंदीचे उल्लंघन आहे.’ इस्रायलने असेही म्हटले आहे की, सीरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल शारा यांनी, सर्व नागरिकांचे संरक्षण करणार असल्याचे म्हटले होते, मात्र युद्धबंदी असूनही, ड्रुझ नागरिक सुरक्षित नाहीत.
तुर्की सीरियाला मदत करणार
हे युद्ध आणखी पेटण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुर्कीने सीरियाला इस्रायलविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्यास सांगितले आहे. तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी सीरियाला शस्त्रे देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.