माजी मंत्री आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनातच जोरदार हाणामारी झाली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात मला मारण्यासाठीच गुंड आणण्यात आले होते, असा गंभीर आरोप केला आहे. यानंतर आता माजी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
गुंडाना धमक्या दिल्या जातात – उद्धव ठाकरे
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून सत्तेचा माज दिसत आहे, आपण बॉक्सिंग पाहिली, मंत्र्याना खोके उघडताना पाहिलं आहे. काल विधिमंडळाच्या आवारात हाणामारी झाली. महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल अशा या घटना आहेत. आपली सत्ता आलीच पाहिजे यासाठी, एकतर आमच्याकडे ये नाहीतर तुरुंगात जा अशा धमक्या गुंडांना दिल्या जातात. त्यानंतर त्यांना पक्षात घेतलं जात, त्यांना गंगास्नान घालून पवित्र केलं जातं. यामुळे गुंडांचा नवा राजकीय जन्म होतो.
देशात राज्याची प्रतिमा काय झाली असेल? – उद्धव ठाकरे
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, ‘आता सर्व पक्षांनी एकत्र बसून अशे गुंड पक्षात घेतले असतील किंवा त्यांना कळत-नकळत त्यांनी निवडूण आणले असेल आणि त्यांना पदावरून दूर काढलं पाहिजे. विधीमंडळ परिसरात असा राडा होत असेल तर देशामध्ये राज्याची प्रतिमा काय झाली असेल? याआधी असं कधी घडलं नव्हत. अनेक पक्षांनी गुंडांना सोबत घेतलं आहे. लोकशाहीचा खून करणारे असेल लोक विधिमंडळात वावरायला लागले तर जनतेने काय करायचं?’ असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना विधानभवनाच्या परिसरात आव्हाड आणि पडळकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना शिवीगाळही झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना घडल्यानंतर आव्हाड यांनी संताप व्यक्त केला होता. विधिमंडळात आमदार सुरक्षित नसतील तर गंभीर बाब आहे, असं ते म्हणाले होते.