इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हा 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. सामन्याचा थरार हा मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात रंगणार आहे. भारतीय संघ मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी चौथा सामना हा प्रतिष्ठेचा आणि अटीतटीचा आहे. या सामन्याच्या काही तासांआधी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने पत्रकार परिषदेला संबोधित केलं. सिराजने या दरम्यान प्लेइंग ईलेव्हनबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
चौथ्या सामन्याआधी भारताच्या अनेक खेळाडूंना दुखापत झाली. नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे उर्वरित 2 सामन्यांमधून बाहेर व्हावं लागलं आहे. तर अर्शदीप सिंह याला दुखापतीमुळेच चौथ्या कसोटीतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित आहे. सिराजने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 मॅचविनर खेळाडू खेळणार असल्याचं सांगितलं आहे.
सिराजने पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलासा दिला. जसप्रीत बुमराह या आरपारच्या लढाईत खेळणार असल्याचं सिराजने स्पष्ट केलं. भारतीय संघ चौथा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार असल्याने भारतासाठी हा मोठा दिलासा समजला जात आहे.
“जस्सी भाई (जसप्रीत बुमराह) तर खेळणार. आकाश दीप याला ग्रोईनचा त्रास आहे. आकाशने आज बॉलिंग केली. आता फिजिओ पुढचं काय ते ठरवतील. टीम कॉम्बिनेशनमध्ये बदल होत आहे. मात्र आम्हाला चांगली बॉलिंग करण्याची गरज आहे. आमचं लक्ष्य एकच आहे. चांगल्या ठिकाणी बॉलिंग करायचं”, असं सिराजने म्हटलं.
बुमराहने या मालिकेतील 2 सामन्यांमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी केली आहे. बुमराहने 2 सामन्यांमध्ये एकूण 12 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने या दरम्यान 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
सिराजकडून बुमराहबाबत मोठी अपडेट
दरम्यान मँचेस्टरमधील भारताची कसोटी सामन्यांमधील आकडेवारी सर्वात मोठी आणि चिंताजनक बाब आहे. भारताला आतापर्यंत या मैदानात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल याच्यासमोर भारताला या मैदानात विजय मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे.