भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान अचानक पृथ्वी शॉचा विषय पटलावर आला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना चर्चांना उधाण आलं आहे. सध्या पृथ्वी शॉ भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. मात्र त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्येही स्थान मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे त्याने मुंबई क्रिकेट सोडत महाराष्ट्र क्रिकेटमधून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉमधील क्रिकेट खेळण्याची प्रतिभा सर्वांनाच माहिती आहे. मात्र सध्या त्याला संघाबाहेर बसण्याशिवाय पर्याय नाही. हाच संदर्भ पकडून इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने पृथ्वी शॉला टोमणा मारला आहे. याला निमित्त ठरलं ते सरफराज खानचं ट्रान्सफॉर्मेशन.. कारण पृथ्वी शॉसारखा सरफराज खानही त्याच्या फिटनेसवरून ट्रोल होत होता. मात्र त्याने या सर्वांवर मात करत फिट अँड फाईन असल्याचं दाखवून दिलं आहे. सरफराज खान बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 स्पर्धेत टीम इंडियाचा भाग होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. सध्या टीमच्या बाहेर असून त्याने आपल्या फिटनेसवर काम केलं आहे. मागच्या दोन महिन्यात त्याने 17 किलो वजन कमी केलं आहे.
केविन पीटरसनने सरफराज खानचा फोटो ट्वीट करत लिहीलं की, छान प्रयत्न तरुणा! अभिनंदन आणि मला खात्री आहे की हे तुला मैदानावर चांगले आणि अधिक सातत्यपूर्ण कामगिरी करण्यास मदत करेल. तू तुझे प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी घालवलेला वेळ मला आवडला. कोणी पृथ्वी शॉला हा फोटो दाखवू शकेल का? ते करता येईल.” सरफराज खान पूर्वीपेक्षा खूपच बारीक दिसत आहे. सरफराज खानचे परिवर्तन पाहून पीटरसनही आश्चर्यचकीत झाला आहे. त्याने सरफराजचं कौतुक करताना पृथ्वी शॉला टोमणा मारला आहे.
पृथ्वी शॉ सध्या 25 वर्षांचा आहे. त्याने भारतासाठी 5 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 339 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. दुसरीकडे, सरफराज खानने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पदार्पण केलं होतं. त्याने भारतासाठी 6 कसोटी खेळल्या असून यातील 11 डावात 37.10 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकं आहेत. त्यामुळे सरफराजला पुन्हा कधी संधी मिळेल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.