भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना अवघ्या काही तासांनी सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार शुबमन गिलने इंग्लंड संघावर तोफ डागली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या भांडणाचा त्याने उल्लेख केला. या सामन्यात शुबमन गिल आणि इंग्लंडचा सलामीचा फलंदाज जॅक क्राउली यांच्यात वाद झाला होता. या वादाने संपूर्ण क्रीडाविश्वात चर्चा रंगली होती. इतकंच काय तर काही काळ तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे खेळभावनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. या संपूर्ण प्रकरणावर चौथ्या कसोटीपूर्वी कर्णधार शुबमन गिल याने मौन सोडलं. पत्रकार परिषदेत त्याने इंग्लंड संघावर गंभीर आरोप केले. जॅक क्राउली वेळकाढूपणा करत होता. तो मुद्दाम असं करत असल्याने शुबमन गिलचा पारा चढाला. याबाबत सर्वकाही शुबमन गिलने पत्रकारांसमोर मांडलं. इतकंच काय तर इंग्लंडने फलंदाजीसाठी नाही तर डाव सुरु करण्यासही वेळ घालवला. गिलच्या मते, इंग्लंड संघाला खेळण्यासाठी सात मिनिटे देण्यात आली होती. पण ते 90 सेकंद म्हणजेच दीड मिनिटं उशिरा मैदानात आले. त्यातही त्यांनी मैदानात वेळ घालवला.
भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘इंग्लंडच्या फलंदाजांकडे खेळण्यासाठी 7 मिनिटांचा कालावधी होता. ते मैदानात 90 सेकंद उशिराने आले. 10-20 नाही तर 90 सेकंद उशिरा आले. जर आपण त्यांच्या परिस्थितीत असतो तर आपल्यालाही असेच करावं वाटलं असतं. पण त्यासाठीही एक पद्धत आहे. ही काय खेळ भावना नव्हती. मला असा काही वाद घालण्याचा हेतू नव्हता. पण कधी कधी भावनेच्या भरात या गोष्टी होतात.शुबमन गिलच्या विधानामुळे पुन्हा एकदा क्रिकेटमधील खिलाडूवृत्तीच्या भावनेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ‘
चौथ्या कसोटी सामन्यात भारतावर दडपण असणार आहे. हा सामना जिंकावा किंवा ड्रॉ करावा लागेल. अन्यथा भारताला ही मालिका गमवण्याची वेळ येईल. भारताने तिसरा कसोटी सामना हातातून घालवला असं म्हणावं लागेल. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा वगळता एकही फलंदाज हवी तशी फलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे भारताचा निसटता पराभव झाला. भारताला अवघ्या 22 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवामुळे भारतीय संघ मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे.