इंग्लंड विरुद्ध इंडिया चौथ्या कसोटी सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे. उभयसंघातील चौथ्या सामन्याला 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे. हा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे चौथा सामना भारतासाठी करो या मरो असा आहे. इंग्लंडने सामन्याच्या 48 तासांआधी प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत चौथ्या सामन्यासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलंय. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघामागे दुखापतींचा ससेमिरा कायमच आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणत्याही स्थितीत 2 बदल होणार असल्याचं निश्चित आहे.
बीसीसीआयने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी या दोघांबाबत सोमवारी 21 जुलै रोजी अपडेट दिली. त्यानुसार अर्शदीप सिंह चौथ्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचं जाहीर केलं. तर नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर झाल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं. त्यानंतर 22 जुलैला सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार शुबमन गिल याने वेगवान गोलंदाज आकाश दीप बाहेर झाल्याचं सांगितलं. अशाप्रकारे दुखापतीने भारताच्या 3 खेळाडूंची विकेट काढली. त्या तिघांपैकी 2 खेळाडू हे तिसऱ्या कसोटीतील प्लेइंग ईलेव्हनमध्ये होते.
नितीश कुमार रेड्डी आणि आकाश दीप हे दोघे तिसऱ्या सामन्यात खेळले. तर अर्शदीप सिंह याला तिन्ही सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र अर्शदीपला चौथ्या सामन्यात संधी देण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अर्शदीप दुखापतीच्या कचाट्यात अडकल्याने आता त्याला पदार्पणासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
त्यामुळे आता हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन चौथ्या सामन्यात आकाश आणि नितीश या दोघांच्या जागी कुणाला संधी देणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. आकाशच्या जागी 24 वर्षीय अंशुल कंबोज याचा समावेश केला जाऊ शकतो. अंशुलला संधी मिळाल्यास त्याचं कसोटी पदार्पण ठरेल. तसं झाल्यास अंशुल या मालिकेतून भारताकडून पदार्पण करणारा साई सुदर्शन याच्यानंतर पहिला आणि एकूण दुसरा खेळाडू ठरेल.
तर नितीश कुमार रेड्डी याच्या जागी शार्दूल ठाकुर याचा समावेश केला जाऊ शकतो. नितीशला दुसऱ्या सामन्यात शार्दूलच्या जागी संधी देण्यात आली होती. त्यामुळे शार्दूलचं आता पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट या 2 जागांबाबत काय अंतिम निर्णय घेतात? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
दरम्यान इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. युवा फिरकीपटू शोएब बशीर याच्या जागी लियाम डॉसन याचा समावेश करण्यात आला आहे.