नवी दिल्ली : ‘‘गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबाबत विमान अपघात तपास विभागाच्या (एएआयबी) प्राथमिक अहवालात विमान किंवा इंजिनामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड किंवा देखभालीशी संबंधित समस्या आढळून आलेली नाही.
सर्व अनिवार्य देखभालीचे कामही पूर्ण झाले होते,’’ असे ‘एअर इंडिया’चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी म्हटले आहे. १२ जून रोजी झालेल्या दुर्घटनेत २६० लोकांचा मृत्यू झाल्यानंतर विविध स्तरांवर अपघाताच्या कारणांबाबत तर्कवितर्क केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर ‘एअर इंडिया’चे सीईओ बोलत होते.
विल्सन म्हणाले, ‘‘प्राथमिक अहवालात कोणतेही ठोस कारण नमूद करण्यात आलेले नाही; तसेच कोणत्याही शिफारशी करण्यात आलेल्या नाहीत. चौकशी पूर्ण होण्याआधी निष्कर्ष काढण्याचे सर्वांनी टाळावे. याबाबतचा तपास अद्याप अपूर्ण आहे. प्राथमिक अहवालात विमान किंवा इंजिनमध्ये कोणतीही यांत्रिक किंवा देखभाल-संबंधित समस्या आढळून आलेली नाही; तसेच सर्व अनिवार्य देखभालीची कामेही पूर्ण झालेली होती.
इंधनाच्या गुणवत्तेशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती आणि टेकऑफ दरम्यान कोणतीही वेगळी स्थित आढळली नव्हती. वैमानिकही उड्डाणापूर्वीच्या सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले होते. त्यांच्या आरोग्याची स्थितीही उत्तम होती; तसेच त्यात कोणतीही अनियमितता असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आलेले नाही. सावधगिरीचा उपाय म्हणून ताफ्यातील प्रत्येक बोइंग ७८७ विमानाची तपासणी करण्यात आली आणि सर्व विमाने सेवेसाठी पूर्णपणे योग्य असल्याचे आढळले होते’’
विल्सन पुढे म्हणाले, ‘‘प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झाल्यामुळे संपूर्ण जगाला या दुर्घटनेत नेमके काय घडले यासंबंधी अधिक तपशील मिळायला सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे या अहवालाने अधिक स्पष्टता दिली; पण त्याचबरोबर काही नवे प्रश्नही निर्माण केले. जोपर्यंत अंतिम अहवाल सादर होत नाही किंवा अपघाताचे निश्चित कारण समोर येत नाही, तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. जगभरातील आपल्या ग्राहकांना सुरक्षित व विश्वासार्ह हवाई प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.’’
‘फ्युएल स्वीच’च्या तपासणीचे आदेशपुढील आठवडाभराच्या कालावधीत सर्व विमानांच्या इंजिनांच्या फ्युएल स्वीचची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आज नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) सर्व कंपन्यांना दिले आहेत. गुजरातमध्ये ‘एअर इंडिया’ कंपनीच्या विमानास झालेल्या अपघाताला दोन्ही इंजिनांचे बंद झालेले फ्युएल स्वीच कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आल्यामुळे सर्व कंपन्यांना हा आदेश देण्यात आला आहे. सर्व नोंदणीकृत विमानांनी इंजिनांच्या फ्युएल स्वीचची २१ जुलैपर्यंत तपासणी करणे अनिवार्य आहे.
Nagpur News: नागपुरात सहा महिन्यांत पायी चालणाऱ्या ४९ जणांचा मृत्यूएक विमान कंपनी म्हणून ‘एअर इंडिया’ने आपले कार्य निष्ठेने पार पाडले पाहिजे. प्रामाणिकपणा, उत्कृष्टता, ग्राहककेंद्री दृष्टिकोन आणि संघभावना या मूल्यांप्रति एकनिष्ठ राहिले पाहिजे. या अपघाताप्रकरणी अंतिम अहवाल बाकी असल्याने त्यानंतरच आपल्याला निष्कर्ष काढता येईल.
- कॅम्पबेल विल्सन, ‘एअर इंडिया’चे सीईओ