अजित दादांना मंगळवारी भेटण्यापूर्वी माणिकराव कोकाटेंच मोठं विधान, राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण
GH News July 27, 2025 12:09 AM

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहेत. छावा संघटनेचे विजय घाडगे यांना तसा शब्द आज अजित पवार यांनी दिला आहे. त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी केलेलं एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अजित पवारांनी राज्याचं नेतृत्व करावं – कोकाटे

माणिकराव कोकाटे यांनी एका सभेत बोलताना म्हटले की, ‘अजित पवार आम्हाला न्याय देऊ शकतात असं जनतेला वाटत आहे. आता राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी राज्याचं नेतृत्व करावं अशी तुमची माझी इच्छा आहे.’ याचाच अर्थ कोकाटे यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

कोकाटेंच्या व्हिडिओमुळे राजकारण पेटलं

माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेनं राजीनाम्यासाठी त्यांना निवेदन दिलं. याचवेळी काही कार्यकर्त्यांकडून सुनील तटकरे जिथे बसले होते, तिथे त्यांच्या टेबलवर पत्ते उधळण्यात आले. यानंतर तटकरे यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावाचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. यावेळी विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे राजकारण आणखी पेटलं होतं.

मुख्यमंत्री फडणवीसही नाराज

काही मंत्र्यांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर आले असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाली होती, ही चर्चा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता फडणवीस या मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.