इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामागे दुखापतीचं ग्रहण लागलं. इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या कसोटीआधी आकाश दीप आणि अर्शदीप सिंह या 2 वेगवान गोलंदाजांना दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. तर ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याचा दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतूनच पत्ता कट झाला. एकाच वेळी दुखापतीने 3 खेळाडूंची विकेट काढली. मात्र ही दुखापत एका खेळाडूच्या पथ्यावर पडली आणि त्याला थेट कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. अंशुल कंबोज याचा संघात कव्हर म्हणून समावेश करण्यात आला. मात्र अंशुलला इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली.
हरियाणातील एका छोट्या गावातून आलेल्या अंशुलला मँचेस्टरमध्ये खेळण्याची संधी मिळाली. हरियाणा ते मँचेस्टर या प्रवासात अंशुलला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. अंशुलने टीम इंडियाकडून टेस्ट डेब्यू करणारा 318 वा खेळाडू होण्याचा बहुमान मिळवला.
अंशुल कंबोज मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात जवळपास 35 वर्षांनंतर पदार्पण करणारा पहिला भारतीय ठरला. अंशुलआधी अनिल कुंबळे याने 9 ऑगस्ट 1990 साली पदार्पण केलं होतं. अंशुल आणि अनिल कुंबळे या दोघांमध्ये अनेक साम्य आहेत. दोघांच्या नावातील आणि आडनावातील पहिलं अक्षर AK सारखं आहे. तसेच दोघांनाही एका डावात 10-10 विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय.
एकाच डावात 10-10 विकेट्स
अंशुलने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या 2024-25 या हंगामात रोहतकमध्ये हरियाणासाठी खेळताना केरळ विरुद्ध एका डावात सर्वच्या सर्व 10 विकेट्स मिळवल्या होत्या. अंशुलने त्या सामन्यात 30.1 षटकांमध्ये 49 धावांच्या मोबदल्यात 10 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. अंशुलने या दरम्यान 9 षटकं निर्धाव टाकली होती.
अंशुल पदार्पण करताच एकच जन्मतारीख असणारा भारताचा सहावा खेळाडू ठरला. अंशुल व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, आरपी सिंह, करुण नायर आणि श्रेयस अय्यर यांचीही जन्मतारीख ही 6 डिसेंबर आहे.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंह याचा जन्म 6 डिसेंबर 1985 साली रायबरेलीत झाला. ऑलराउंडर रवींद्र जडेजाचा जन्म सौराष्ट्रमधील नवगाव खेड येथे 6 डिसेंबर 1988 साली झाला. करुण नायर 6 डिसेंबर 1991 रोजी राजस्थानमधील जोधपूरमध्ये जन्मला. जसप्रीत बुमराह याचा 6 डिसेंबर 1993 साली अहमदाबादमध्ये जन्म झाला. तर श्रेयस अय्यरचा जन्म 6 डिसेंबर 1994 साली मायानगरी मुंबईत झाला.
अंशुलचा भारतीय संघात अर्शदीप सिंह याचा कव्हर म्हणून समावेश केला होता. मात्र अंशुलला काही तासांमध्ये प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. अंशुल सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातील आहे. अंशुलचे वडील उधम सिंह हे फाजिलपूरमध्ये शेती करतात. या शेतकरी कुटुंबाने आपल्या मुलाला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ दिली.
अंशुलचा लहानपणापासूनच क्रिकेटकडे ओढा होता. अंशुलची क्रिकेटमधील आवड पाहता कुटुंबियांनी त्याला योग्य मार्ग दाखवला. कुटुंबियांनी अंशुलला करनालमधील सतीश राणा अकादमीत दाखल केलं. अंशुलने अभ्यासात कोणताही खंड पडू न देता सातत्याने क्रिकेट सरावही सुरु ठेवला. मात्र घरापासून क्रिकेट अकादमी हे अंतर जवळपास 8 किमी इतकं होतं. त्यामुळे अंशुलला 8 किमी पायपीट करुन जायला लागायचं. त्यामुळे अंशुल सकाळी 4 वाजता उठायचा.
अंशुलला कठोर मेहनतीनंतर 2022 साली देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. अंशुलने विजय हजारे ट्रॉफी 2023-2024 स्पर्धेतील 10 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या. अंशुलची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये निवड करण्यात आली. अंशुलला मुंबई इंडियन्सने 20 लाख या बेस प्राईजसह आपल्यासह जोडलं. अंशुलने त्याच्या आयपीएल पदार्पणातील हंगामात 3 सामन्यांमध्ये 2 विकेट्स घेतल्या. मुंबईने त्यानंतर अंशुलला रिलीज केलं.
मुंबईने रिलीज केल्यानतंर अंशुलला चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोटींचा भाव मिळाला. सीएसकेने अंशुलला 3 कोटी 40 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. अंशुलने आयपीएल 2025 मधील 8 सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या.
अंशुलने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 24 सामन्यांमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अंशुलने 25 लिस्ट ए मॅचेसमध्ये 40 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. अंशुलने आतापर्यंत खेळलेल्या 30 टी 20 सामन्यांमध्ये 34 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच अंशुलने एका अर्धशतकासह 486 धावाही केल्या आहेत.