Latest Maharashtra News Updates: बीड पोलिसांनी आतातरी मुंडे प्रकरणात कारवाई करावी- सोळंके
esakal July 27, 2025 12:45 AM
Beed Live: बीड पोलिसांनी आतातरी मुंडे प्रकरणात कारवाई करावी- सोळंके

महावेद मुंडे प्रकरणात नवनवीन माहिती पुढे येत आहे. २० महिने झाले तरी आरोपी निष्पन्न होत नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही. नवीन माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हे दाखल करणं गरेजचं आहे, असं माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले.

Nagpur Live: नागपूर-वर्धा रस्त्यावर कोसळलं झाड

नागपुरात सकाळपासून सुरू असलेल्या रिप रिप पावसामुळे नागपूर-वर्धा रोडवर रहाटे कॉलनी जवळील मुख्य रस्त्यावर मोठ झाड कोसळलं आहे. सुदैवाने झाड पडताना गाडी झाडाखाली न आल्याने दुर्घटना टळली. मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने सध्या एका बाजूची वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आलीय.

पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

नागपूर जिल्ह्याचा कामठीतील पाच मित्र हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा तलावाकडे फिरायला गेले. मात्र पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला अन 20 वर्षीय तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. पियुष सुरज सुखदेवे अस मृत तरुणाचे नाव आहे.

Mumbai Live: दादरमध्ये उज्ज्वल निकम यांचा सत्कार समारंभ

ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभा सदस्य पदी वर्णी लागली. या नियुक्तीबद्दल आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात निकम यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात भाजप नेते प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. दरम्यान, सत्कार स्वीकारल्यानंतर उज्ज्वल निकम हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

Jalgaon News: गिरणा नदीवरील माहेजी ते हनुमंखेडा पुलाचे काम संथ गतीने सुरू

जळगावच्या पाचोर्यातील माहेजी येथील गिरणा नदीवरील माहेजी ते हनुमंखेडा या पुलासाठी आमदार किशोर पाटील यांनी २०कोटीचा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु दोन वर्षांपासून मंजूर झालेल्या या पुलाचे काम संत गतीने सुरू आहे. अजून या कामासाठी तरी वर्षभराची प्रतिक्षा करावी लागेल. तो पर्यंत मात्र या नावेतून प्रवाशांना जीवघेण्या प्रवासाचा सामना करावा लागेल.

Manmad News: मेंढपाळाचा बैल वादळी पावसात वीज पडून जागीच ठार

मेंढपाळावर आभाळ कोसळल्यासारखी दुर्दैवी घटना घडली. चराईसाठी मनमाड परिसरातील आलेल्या बाबुलाल बोरकर या मेंढपाळाचा बैल वादळी पावसात वीज पडून जागीच ठार झाला. सुमारे नऊ वर्षे वयाच्या बैलाचा मृत्यू झाल्याने बोरकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान घडली. विजेच्या कडकडाटात दोन बैलांपैकी एकावर वीज कोसळली. बैल जागीच ठार झाला, तर दुसरा बैल थोडक्यात बचावला. बैलाच्या मृत्युमुळे बोरकर कुटुंबाच्या उपजिविकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मंडळ अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा बोरकर कुटुंबाने व्यक्त केली आहे.

Nashik News: मनमाड बसस्थानक परिसराची दुरवस्था...

नाशिकच्या मनमाडमध्ये बस स्थानक इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु त्यातच बस स्थानक आवारातील रस्त्याच्या दुरावस्था  झाली असून, रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने संपर्ण परिसर चिखलमय झाल्याने प्रवाश्यांना चिखलातून वाट काढावी लागत असल्याने मोठ्या प्रवाशी, विद्यार्थी , चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Mumbai Crime: ऑनलाईन जुगारात पैसे हरल्याने सोनसाखळी खेचणा-या इसमांना माटुंगा पोलीसांनी केली अटक

माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १९ जुलै रोजी रात्री 8. 30 वा दरम्यान जैन मंदिरात दर्शन घेऊन घरी पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळयातील सोन्याची चैन समोरून आलेल्या मोटार सायकल वरील दोन अनोळखी इसमांनी खेचून पळून गेले होते. त्याबाबत पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यातील खालील आरोपींना अटक करून खालील वर्णनाची मालमत्ता हस्तगत करण्यात आली.

Parbhani Live: परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी शहरासह जिल्हाभरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय मागच्या दोन तासांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला यामुळे परभणी शहरातील रस्त्यांवर जागोजागी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे ज्यामुळे परभणीकरांना या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो तर दुसरीकडे जिल्ह्यातील पिकांनाही मोठा दिलासा मिळालाय

Buldhana Live: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाजवळून वाहणाऱ्या काच नदीला पुन्हा एकदा पूर आलाय, त्यामुळं अवघ्या महिन्या भरात या परिसरातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली जाऊन शेतीचं मोठं नुकसान झालंय. या भागातून जाणाऱ्या समृद्धी समृद्धी महामार्गावरचं किमान १० किलो मीटर भागातील पाणी एकाचं ठिकाणावरून बाहेर पडत असल्यानं थोडा पाऊस झाला तरी वारंवार काच आणि उतावळी नदीला पूर येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या संदर्भात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केलीये.

Live: CSMT स्टेशनला बॉम्बस्फोटाची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली.

काल एका व्यक्तीनं मुंबईच्या DGP कार्यालयात फोन करून सांगितलं की, संध्याकाळी स्टेशनवर बॉम्ब ठेवण्यात येईल.

Live: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

- आरोपी वाल्मीक कराडचे बीड जिल्ह्यात बॅनर,

- बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

- अजित पवारांनी कार्यवाही केली पाहिजे, अशी धनंजय देशमुख यांची मागणी.

- बीड जिल्हा कारागृहातून आरोपी वाल्मीक कराडचा एका व्यक्तीला फोन अंबादास दानवे यांचा खळबळजनक दावा

प्रफुल्ल लोंढेची नार्को टेस्ट करा- एकनाथ खडसे

- दूध का दूध, पाणी का पाणी होईल

- माझा मुलांच्या मृत्यूची cid चौकशी करा

ठाकरे गटाला महापालिकेत खिंडार

जळगावात शिवसेना ठाकरे गटाचे 13 महापालिकेच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. यात विधानसभेत भाजपमध्ये कारवाई झालेल्या काही नगरसेवक सुद्धा पुन्हा भाजपमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीची चर्चा आहे. संबंधित सर्व नगरसेवकांच्या भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशाच्या चर्चेनेच भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले असून भाजप नगरसेवकांनी या प्रवेशाला आतापासूनच विरोध दर्शवला आहे

Mumbai Live: गुणरत्न सदावर्तेंची ये रे ये रे पैसावर टीका

जे गुंडगिरीची भाषा चालली आहे ना मल्टिप्लेक्स वर दगड मारणार. गुंडागर्दी की भाषा बंबई में नाही चाले. फिल्म एन्टरटेन्मेंट है पब्लिक डिमांड वर चालत असते. ज्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही ते चित्रपट का बघतील, असा खोचक टोला गुणरत्न सदावर्ते यांनी ये रे ये रे पैसा सिनेमावर केली आहे.

Solapur Live: संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील दुबार पेरणीचे संकट टळले

सोलापूर शहरासह जिल्ह्यात पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा…  जिल्ह्यात 3 लाख 15 हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्यात… दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखवलाय… जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या… मात्र महिनाभर पाऊस न आल्याने शेतकरी चांगलाच धास्तावलेला पाहायला मिळाला

Nashik Live : हवेच्या गुणवत्तेसाठीचा निधी अडकला; नाशिकला निवडणुकीची प्रतीक्षा

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने नाशिक महापालिकेसाठी मंजूर करण्यात आलेल्या ८७ कोटींच्या निधीपैकी ७५.४२ कोटी खर्च झाले आहेत. उर्वरित निधी खर्च करताना दमछाक होत आहे. त्यात महापालिकेची निवडणूक नसल्याने दोन वर्षांपासून शासनाने निधी अडवून धरला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच निधी प्राप्त होण्याच्या आशा आहेत.केंद्र सरकारकडून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) हाती घेतला आहे. स्वच्छ हवेसाठी राज्यातील १९ शहरांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. महापालिकेला केंद्र सरकारकडून ८७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीतून महापालिकेने चार यांत्रिकी झाडूंची खरेदी केली. त्र्यंबक रोडवरील जिल्हा रुग्णालय ते पंचायत समिती यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. चार वर्षांत ८७ कोटी रुपये निधी प्राप्त झाला.

Live : वाघोलीत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपाययोजना सुरू

पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने वाघोलीत प्रायोगिक तत्वावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामुळे वाहन चालक गोंधळात पडत असून वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालकांनी चौकात लावलेल्या फलकाकडे लक्ष देऊन त्या प्रमाणे नियम पाळावेत. असे आवाहन पुणे वाहतूक विभागाने केले आहे.वाघोलीतील कोंडी कमी झाली असली तरी ती पूर्णपणे फुटलेली नाही. ही कोंडी पूर्णपणे कमी करण्याच्या दृष्टीने पुणे शहर वाहतूक विभागाने काही उपाययोजना आखल्या आहेत. त्याची अंमलबजावणी शुक्रवार पासून सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव स्वतः हा वाघोलीतील चौकात उभे राहून मार्गदर्शन करीत आहेत. वाघोली वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे हे कर्मचाऱ्यासह वाहतुकीवर लक्ष ठेवून आहेत. वाघोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे हे ही अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मदत करीत आहेत. शनिवारीही या सर्व अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. यावेळी अनंता कटके, कल्पेश जाचक, संपत गाडे, तात्या आव्हाळे उपस्थित होते.

* आव्हाळवाडी चौकातून लोहगाव कडे जाण्यास बंदी.

* केसनंद फाटा चौकात उजवीकडे वळण्यास ( केसनंद कडे ) बंदी.

* केसनंद फाटा चौकापासून पुढे ३०० मीटर वर ( स्टार बजार  जवळ ) उजवीकडे (केसनंद कडे ) वळण घेता येईल.

* केसनंद रोड वरून नगर कडे जाणाऱ्यांसाठी केसनंद फाटा चौकातून वळण घेता येईल.

* आव्हाळवाडी चौकातून लोहगाव कडे अथवा गावात जाण्यासाठी वाघेश्वर मंदिर चौकातून जावे लागेल.

Live : सोमवारी माणिकराव कोकाटे राजीनामा देणार असल्याची चर्चा

सोमवारी माणिकराव कोकाटे राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेत रमी खेळल्याच्या आरोपामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे ते सोमवारी राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.

Nashik Live : जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांचा नाशिकमध्ये छापा

नाशिकमधील देवळाली गवत परिसरातील कपालेश्वर इमारतीत राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियरची जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी सुरु आहे. श्रीकांत परे असं संशयिताचं नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. संशयित बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

Rajshthan Live Update: वसुंधरा राजे यांनी प्राथमिक शाळेचे छत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची घेतली भेट

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांनी काल प्राथमिक शाळेचे छत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना भेटले, त्यात सात विद्यार्थी मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले.

PM Modi LiveUpdate: पतंप्रधान मोदींनी मालदीवच्या पीपल्स मजलिसचे सभापती अब्दुल रहीम अब्दुल्ला यांची भेट घेतली

पतंप्रधान मोदींनी मालदीवच्या पीपल्स मजलिसचे सभापती अब्दुल रहीम अब्दुल्ला यांची भेट घेतली

Beed LiveUpdate: बीडमधील वांगी येथे शेतकऱ्यांच्या पंधरा शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला

बीड तालुक्यातील वांगी येथे शेतकऱ्यांच्या 15 ते 20 शेळ्यांवरती बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये सर्व शेळ्या मृत पावल्या आहेत शेतकऱ्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वनविभागाला अनेक वेळा गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली होती मात्र वनविभागाने माहिती देऊनही याचा बंदोबस्त न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पंधरा शेळ्यांचा बिबट्याने पडदा फास केला असून लाखो रुपयाचे नुकसान झालं आहे वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून नुकसान भरपाई आदिवासी हमी वनविभागाने दिली आहे हा सर्व प्रकार बीडच्या वांगी येथे घडला आहे.

Kolhapur Live : माजी खासदार राजू शेट्टी बिंदू चौकात येणार, पोलिसांचा मोठा फौजफाटा

शक्तिपीठ महामार्गावरून आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर आरोप केले होते.

यावर माजी खासदार आज १२ वाजता बिंदू चौकात आरोपांचे खंडण करण्यासाठी येणार आहेत.

यापार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राजू शेट्टी १२ वाजता बिंदू चौकात पोहचणार असल्याची माहिती देण्यात आली.

Ajit Pawar Live : मी कुणालांही झापलं नाही

अजित पवार यांनी पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांना झापल्याची माहिती समोर आली होती.

यावर अजित पवार म्हणाले मी कोणालाही झापलं नाही. पुण्यातील आयटी पार्क अधिकारी आणि नेत्यांसोबत पाहणी केली.

ज्या सूचना आहे त्या सूचना केल्या आहेत. खड्डे मुजवण्याचे काम लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Kolhapur Live : कोल्हापूर एसपी ऑफिसमधील हेड क्लार्कने पोलिसाकडून बदलीसाठी घेतले ३० हजार

कोल्हापूर आंतरजिल्हा बदलीसाठी पोलिसांकडून ३० हजारांची खंडणी स्वीकारल्या प्रकरणी पोलीस मुख्यालयातील हेड क्लार्कसह, महिला कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष मारुती पानकर (रा. कसबा बावडा) याला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. तर महिला कॉन्स्टेबल धनश्री उदय जगताप हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार रितेश मनोहर ढहाळे यांनी २३ जुलैला धनश्री जगताप हिला ऑनलाइन पैसे पाठवल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

यातील फिर्यादी हे कोल्हापर जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून चंदगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी वडीलांच्या आजारपणामुळे आंतर जिल्हा बदली करीता अर्ज दिलेला होता.

Akola Live : अकोला जिल्ह्यातील शेतरस्त्यांची दयनीय अवस्था; शेतकऱ्यांची हालअपेष्टा वाढल्या!

अकोला जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांतील शेतामार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. विशेषतः तामसी-बटवाडी भागातील शेतरस्त्यांचा व्हिडिओ समोर आला असून, या रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे किंवा ट्रॅक्टरसारखी वाहने बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले आहे.

या चिखलमय रस्त्यावर अनेक ट्रॅक्टर अडकले असून काही अजूनही तिथेच उभे आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना पावसात शेतीची कामे करणे कठीण होत चालले आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Nashik Live : माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ सिन्नरमध्ये होणारा मेळावा रद्द

- माणिकराव कोकाटे यांनी तंबी दिल्यानंतर समर्थकांनी स्वतःहून बोललेला मेळावा रद्द

- शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास

- माणिकराव कोकाटे यांच्याकडून समर्थकांची समजूत

- माझ्या खात्यात एक रुपयाचा ही भ्रष्टाचार नाही शिवाय राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा खाते म्हणून माझ्या विभागाचं काम

- कोकाटे यांच्याकडून समजूत काढल्यानंतर कोकाटे समर्थकांनी बोलवलेल्या मेळावा रद्द

- कोकाटे यांच्या समर्थनार्थ आज सिन्नर बस स्थानकावर एकवटण्याचं कोकाटे समर्थकांकडून करण्यात आलं होतं आवाहन

Live : ओबीसींसाठी लढणारे तायवाडे डावलले गेले? काँग्रेसच्या बैठकीतून वादाला सुरुवात!

काँग्रेसच्या ओबीसी सेलची राष्ट्रीय बैठक नुकतीच दिल्लीमध्ये पार पडली.

या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी तसेच देशभरातील ओबीसी नेते उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते डॉ. बबनराव तायवाडे यांना या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आले नव्हते.

या बैठकीत ओबीसी समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ठोस चळवळ उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

काँग्रेसने ज्या मागण्यांचा अजेंडा या बैठकीत मांडला, त्या सर्व मागण्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून उचलून धरत आहे.

डॉ. बबनराव तायवाडे हे स्वतः त्या मागण्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर लढा देत आहेत.

त्यामुळे पक्षांतर्गत समन्वयावर आणि नेत्यांच्या सहभागावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Pune Live : पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढील 3 तास मुसळधार पावसाची शक्यता!

पुणे जिल्ह्यात पुढील तीन तासांत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती सचेत अॅपच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मंत्रालय, मुंबई.

Navi Mumbai Live: नवी मुंबईत तुर्भेत रेश्मा कंपनीला भीषण आग

नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसी परिसरातील रेश्मा कंपनीला शुक्रवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. आग इतकी तीव्र होती की काही मिनिटांत संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Kolhapur Live: घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, राधानगरी धरणाचे दरवाजे खुले

कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून राधानगरी आणि दाजीपूर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. या वाढत्या पावसामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भोगावती नदी पात्रात पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू झाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास आणि नदी परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nagpur Live: सार्वजनिक शांतता भंग न झाल्यास भांडण 'गुन्हा' नाही – उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

नागपूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गोंदिया जिल्ह्यातील केटीएस रुग्णालयात घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणातील गुन्हा रद्द करत एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. भांदवी कलम 160 नुसार सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये भांडण होणे आणि त्यामुळे शांतता भंग होणे आवश्यक अट आहे. मात्र, याप्रकरणी सार्वजनिक शांतता भंग झाली असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याने केवळ भांडण झालं म्हणून गुन्हा ठरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही महिलांवर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. हा निर्णय भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दिशादर्शक ठरणार आहे

Pune News : पुण्यात महिलेला हिप्नॉटाइज करत लुटले लाखोंचे दागिने

नसरापूर इथं महिलेला हिप्नॉटाइज करून तिच्या गळ्यातलं अडीच तोळ्यांचं गंठण, हातातली अंगठी असा एकूण तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. महिला मंदिरात दर्शनाला गेली होती. तिथून बाहेर पडताना एका मास्कधारी व्यक्तीने हिप्नॉटाइज केलं. त्यानंतर बनेश्वर उथल्या रोडवर महिलेजवळचंं सोनं लंपास केलं. अज्ञात व्यक्ती आणि महिला दुचाकीवरून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. भोरच्या राजगड पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Nagpur Rain : नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस, उपराजधानीत अनेक भागात साचलं पाणी

आज नागपूर सह पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर नागपुरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उपराजधानी नागपूरात रात्रीपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. मनीष नगर अंडर पासमध्ये देखील पाणी साचले असून नागरिक आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून गाड्या नेत आहेत. सकाळची वेळ असल्याने सर्वांना कामावर जायचं आहे, अनेक स्कूल बसेस देखील या पाण्यातून रस्ता काढून जात आहे.

River Savitri : सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी! नगरपरिषदेने सायरन वाजवून नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा

महाड : मागील 24 तासांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या महाड शहरासह परिसरातील पोलादपूर व महाबळेश्वर येथील पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती नगरपरिषदेच्या सूत्रांकडून मिळाली. सकाळी सहाच्या सुमारास नगरपरिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Nitesh Rane News : पालकमंत्री नीतेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे आज (ता. २६) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा असा ः उद्या सकाळी १०.३० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, ११.३० वाजता जागतिक जलतरण क्रीडा स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल पूर्वा गावडेच्या सत्कार सोहळ्यास उपस्थिती (स्थळ ः पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी), दुपारी २ वाजता अनुसूचित जातीसाठी आयोजित समाज संवाद व तक्रार निवारण मेळाव्यास उपस्थिती (स्थळ ः जिल्हा नियोजन सभागृह सिंधुदुर्गनगरी), सायंकाळी ६ वाजता मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे तीन दरवाजे खुले, ५७८४ क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राधानगरी : येथील राधानगरी धरण काल रात्री दहाच्या दरम्यान पूर्ण क्षमतेने भरून तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून ४२८४ व वीज निर्मितीसाठी १५०० असे ५७८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने भोगावती व पंचगंगा नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Ban on OTT Platforms : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 'उल्लू', 'देसीफ्लिक्स'सह २० ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी

नवी दिल्ली : विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, विशेषत: महिलांचे अश्लील सादरीकरण केल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने ‘उल्लू’, ‘अल्ट’, ‘देसीफ्लिक्स’सह २० ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचे आदेश आज दिले.

Karad News : कऱ्हाडजवळ आजपासून महामार्गावर एकेरी वाहतूक, उड्डाणपुलाचे गर्डर उतरविण्यासाठी नियोजन

Latest Marathi Live Updates 26 July 2025 : पुणे-बंगळूर महामार्गावरील कोल्हापूर नाका ते नांदलापूरदरम्यान होत आलेल्या उड्डाणपुलासाठी सेगमेंट बसविताना वापरलेले गर्डर खाली उतरवण्याचे काम आजपासून (शनिवार) सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ढेबेवाडी फाट्यावरील आणि त्यानंतर कोल्हापूर नाक्यावरील गर्डर खाली उतरवण्यात येणार आहेत. तसेच राधानगरी येथील राधानगरी धरण आज रात्री दहाच्या दरम्यान पूर्ण क्षमतेने भरून तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून ४२८४ व वीज निर्मितीसाठी १५०० असे ५७८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. एअर इंडियाचे जयपूरहून मुंबईला जाणारे एआय ६१२ हे विमान संशयित तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी पुन्हा जयपूर विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, विशेषत: महिलांचे अश्लील सादरीकरण केल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने ‘उल्लू’, ‘अल्ट’, ‘देसीफ्लिक्स’सह २० ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचे आदेश दिले. जास्त नफा मिळविण्यासाठी कर्नाटकी गुळाची कोल्हापुरी लेबल लावून गुजरातमध्ये विक्री होते. यातून कोल्हापुरी गुळाची बदनामी होत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.