फायबरच्या कमतरतेमुळे आतड्यांना निर्माण होऊ शकतो धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
GH News July 27, 2025 01:07 AM

आजकाल फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेल्या आहारामुळे आपल्या प्लेटमधून फायबर जवळजवळ गायब झाले आहे. फायबर म्हणजे तंतुमय घटक जो केवळ पोट स्वच्छ करण्यास मदत करत नाही तर आतड्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचा आहे. जर तुमच्या आहारात फायबरची कमतरता असेल तर त्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर होतो. हळूहळू ही समस्या मोठ्या आजारांमध्ये बदलू शकते.

एम्स दिल्ली येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. दीपक गुंजन यांनी सांगितले की फायबरची कमतरता हळूहळू आतड्याचे आरोग्य कमकुवत करू शकते आणि पोटाशी संबंधित अनेक आजारांना आमंत्रण देते. दररोज 25 ते 30 ग्रॅम फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि डाळींचे प्रमाण वाढवणे महत्वाचे आहे आणि जर समस्या कायम राहिली तर नक्कीच डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या. फायबरच्या कमतरतेमुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि ती कशी पूर्ण करावी हे जाणून घेऊया.

फायबर कमतरतेची लक्षणे

बद्धकोष्ठता: जर तुम्हाला आठवड्यातून 3 वेळापेक्षा कमी वेळा आतड्याची हालचाल होत असेल किंवा मल खूप कठीण असेल, तर हे तुमच्या आहारात फायबर कमी असल्याचे लक्षण आहे.

पोटात जडपणा आणि गॅस: फायबर पचनास मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोट फुगलेले आणि जड वाटते. ज्यामुळे अनेकांना गॅसच्या समस्या निर्माण होतात.

वारंवार भूक लागणे: फायबरमुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. तुम्हाला जर वारंवार भूक लागत असेल तर तुमच्या आहारात फायबरची कमतरता असण्याची शक्यता असू शकते.

वजन वाढणे: फायबरयुक्त पदार्थ हळूहळू पचतात, ज्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते आणि जास्त खाणं टाळता येते. फायबरच्या कमतरतेमुळे तुम्ही अधिक पदार्थांचे सेवन करू लागतात आणि यामध्ये वजन झपाट्याने वाढते.

रक्तातील साखरेची पातळी बिघडणे: फायबर रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

कोलेस्टेरॉल वाढणे: विरघळणारे फायबर शरीरातून खराब कोलेस्टेरॉल (LDL) काढून टाकण्यास मदत करते. जर फायबरची कमतरता असेल तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

फायबर कमतरता भरून काढण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश

– फळे: सफरचंद, नाशपाती, पपई, पेरू

– भाज्या: गाजर, बीन्स, पालक, वाटाणे

– तृणधान्ये: ओट्स, लाल तांदूळ, ओट्स, बार्ली

– डाळी आणि हरभरा: राजमा, मूग, चणे

– बिया आणि नट्स: अळशीच्या बिया, चियाच्या बिया, बदाम

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.