पुणे : ‘‘देवस्थान इनाम जमिनींच्या बाबतीत देव हा जमिनीचा मालक आहे आणि वहिवाटदार केवळ व्यवस्थापक आहे, असा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे देवस्थानच्या जमिनींचे संरक्षण करणे ही विश्वस्तांची जबाबदारी असून त्या जमिनी व ट्रस्ट पुढील पिढीकडे जशेच्या तसे द्यायला हवे,’’ असे मत ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने कै. ॲड. हेमंत फाटे स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. या वेळी ‘महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व कुळ कायदा १९५७ मधील देवस्थान जमिनीबाबत तरतुदी’ याविषयी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले, त्या वेळी ते बोलत होते.
पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर, उपायुक्त डॉ. राजेश परदेशी, सहाय्यक आयुक्त प्रथमेश भोसले, सुधीर कांबळे उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. रूपाली फाटे यांच्याकडे तीन लाख ५५ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.