Pranjal Khevalkar : पुण्यातील खराडी येथील उच्चभ्रू परिसरातील रेव्ह पार्टीने राजकारणात मोठा भूकंप आला. या पार्टीत थेट जावईच सापडल्याने नाथाभाऊ पुन्हा अडचणीत आले. त्यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना या पार्टीतून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे मंत्री आणि आमदार त्यांच्यावर तुटून पडले होते. त्यांच्यासाठी आयते कोलीत मिळाले. यावर आज सकाळीच प्रसार माध्यमांशी संवाद साधत मंत्री गिरीश महाजन यांनी थेट प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी एक मोठा आरोप ही केला.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील उच्चभ्रू खराडी येथे पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. या ठिकाणी हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू असल्याचा दावा पोलिसांनी केला. या ठिकाणी पोलिसांनी हुक्का, दारू, अंमली पदार्थ जप्त केले. या पार्टीत दोन महिला आणि पाच पुरुष असल्याचे समोर येत आहे. सुरुवातीला राज्यातील बड्या महिला नेत्याचा पतीला अटक केल्याचे वृत्त धडकले. पाठोपाठ नाथाभाऊंचे जावईच या कारवाईत पकडल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांचा थेट आरोप
मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी सकाळीच संवाद साधला. याप्रकरणात पोलिस तपास करत आहे. त्यामुळे याविषयीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नसल्याचे ते म्हणाले. पण जी माहिती हाती आली आहे, त्यानुसार, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे या पार्टीत होते. त्यांचा समावेशच नव्हता तर त्यांनी ही पार्टी आयोजित केली होती, असा आरोप महाजन यांनी केला. त्यांच्या या आरोपांमुळे हे प्रकरण गंभीर वळणावर असल्याचे समोर येत आहे. स्थानिक पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना चिमटा
असं काही तरी होईल आणि कुटुंबातील सदस्याला अडकवण्यात येईल असे आपल्याला पूर्वीपासून वाटतं होते. अशा घटनेची पूर्वकल्पना होती, अशी प्रतिक्रिया नाथाभाऊंनी दिल्याचे माध्यम प्रतिनिधींनी महाजन यांना सांगितले. त्यावर महाजनांनी प्रतिक्रिया दिली. मग त्यांनी जावयाला अलर्ट करायला हवं होतं, असं ते म्हणाले. हा तपासाचा भाग आहे, असे महाजन म्हणाले. प्रत्येक वेळीच षडयंत्र कसे असेल, असा सवाल महाजन यांनी केला. 7-8 जणांचे मोबाईल तपासल्यावर समोर येईल. त्यांच्या जावयांना कोणी कडेवर घेतलं आणि तिथे नेऊन ठेवलं, असं तर झालं नाही ना? असा चिमटा महाजनांनी काढला.