मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र, थेट आकडेवारी जाहीर, कारवाई होणार?
Tv9 Marathi July 27, 2025 06:45 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेनंतर राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला जोरदार मतदान केले. सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले. मागील काही दिवसांपासून एक चर्चा जोरदार रंगताना दिसली की, लाडकी बहीण योजना ही बंद होणार. त्यानंतर सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नसून फक्त या अफवा पसरवल्या जात आहेत.

लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. मात्र, या योजनेचा लोकांनी गैरफायदा घेत पैसे लाटल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. योजनेसाठी पात्र नसतानाही अनेकांनी अर्ज केली, त्यावेळी सर्वच लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आले. आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केली जात आहे. राज्य सरकारकडून जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आणि अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर करण्यात आली.

जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले. लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अट हीच आहे की, अर्ज करणारी महिला फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असणारी असावी, दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर अर्ज अपात्र ठरेल. अशा विविध कारणांमुळे 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख महिला व बालविकास विभागाने पटवली. शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवण्यात आली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.