बचतगटांना
निधी मंजूर
चिपळूण ः नवस्फूर्ती महिला बचत प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि १९ गावातील महिलांचा बचतगट मेळावा उत्साहात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्षता साळवी होत्या. महिला बचतगटांसाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेतून तीन तालुक्यांसाठी निधी मंजूर केला असून, गुहागर मतदार संघातील बचतगटांना त्याचा लाभ मिळत आहे. महिला बचतगटांसाठी कोणतेही राजकारण न करता महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विधायक प्रयत्न सुरू आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर महिलांना जास्त आर्थिक लाभ मिळण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले आहे. नवस्फूर्ती महिला प्रभाग रामपूरअंतर्गत १९ ग्रामसंघ बचतगट ३३६ असून, ३०३६ महिला बचतगटातील जोडल्या आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन, महिलांना उत्पादित केलेल्या रानभाजीचे प्रदर्शन आयोजित केले होते. महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. प्रारंभी ईशस्तवन व स्वागतगीतांनी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या वेळी बचतगटांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
जैन संस्थेच्या महिला
महामंत्री केतकी धने
साडवली ः केतकी धने यांची दक्षिण भारत जैन सभा या अत्यंत प्रतिष्ठित व प्रभावी जैन संस्थेच्या महिला महामंत्री म्हणून निवड झाली आहे. साडवलीसारख्या छोट्या गावातून बुद्धिमान, कार्यक्षम व सेवाभावी महिला एवढ्या मोठ्या पातळीवर पोहोचल्याचे पाहून साडवलीवासियांना त्याचा अत्यंत अभिमान वाटत आहे. केतकी या पदाचा योग्य उपयोग करून महिला सशक्तीकरण, जैन संस्कृती व सामाजिक विकास यासाठी नवे आदर्श निर्माण करतील, याबद्दल विश्वास व्यक्त होत आहे.
‘माखजन’मध्ये
आषाढ रंग कार्यक्रम
संगमेश्वर ः तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूलमध्ये आषाढ रंग कार्यक्रमाने रंगत आणली होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकल व समूहगीते सादर केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गाण्यांना उपस्थितांनी उदंड प्रतिसाद दिला. या मुलांची गाण्याविषयीची तयारी ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी यांनी करून घेतली. ''शुद्ध नाही तुझी भावना'', सुंदरते ध्यान'', देव माझा विठू सावळा, चंद्रभागेच्या तिरी, चला हो पंढरी जाऊ, विठ्ठल पाहुणा आला माझा घरा, असे एकापेक्षा एक अभंग विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी आनंद लिंगायत यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.