विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील बाबरे येथील आदिवासी कातकरी मुला-मुलींसाठी अनुदानित आश्रमशाळा आणि चांग्याचा पाडा येथील नूतन माध्यमिक विद्यालय येथे तिमिरातुनी तेजाकडे या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आसरा फाउंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सीमा शुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, त्यासाठी आवश्यक असलेले विषय आणि अभ्यास पद्धती यावर त्यांनी सखोल माहिती दिली. या वेळी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आसरा फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन शिरकर यांनी सांगितले की, आदिवासी भागातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवता यावे, यासाठी आसरा फाउंडेशन यापुढेही अशाच प्रकारची मार्गदर्शन शिबिरे राबवत राहील. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांना सक्षम बनवण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी नूतन माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक एम. एच. हरणे, शिक्षक प्रवीण भेरे, आदिवासी कातकरी अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका आशा रणखांबे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शवली.