Uddhav-Raj Thackeray : निमित्त तर वाढदिवसाचे, चर्चा मात्र मनसे-शिवसेना युतीची, राजकीय मैदानावर नवी खेळी
Tv9 Marathi July 28, 2025 01:45 AM

MNS-Shivsena Alliance : उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मातोश्री गाठत त्यांना शुभेच्छा दिला. सुरुवातीला याविषयीची कोणतीही वार्ता समोर आली नाही. पण अचानक ते कलानगरकडे जात असल्याचे समोर आले. जुलै महिन्यात ठाकरे बंधुची ही दुसरी भेट आहे. त्यामुळे जुलै हा राज्यातील राजकारणासाठी कलाटणी देणारा महिना ठरणार का? याची चर्चा रंगली आहे. निमित्त वाढदिवसाचे असले तरी राज्यात चर्चा युतीची होत आहे. राजकारण राज्याला कोणत्या नवीन राजकीय वळणावर नेणारी याची उत्सुकता ताणल्या गेली आहे.

जुलैमध्ये दोनदा भेट

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयानिमित्त दोन्ही ठाकरे बंधू वरळी डोम येथे 18 वर्षांनी एकत्र आले. 5 जुलै रोजी दोन्ही नेते एकाच मंचावर आले. त्यावेळीच खऱ्या अर्थाने वातावरण निर्मिती झाली होती. त्याला हवा देण्याचे काम असे अधुन मधुन होणार हे या निमित्ताने समोर आले.

भाजपला मराठी आणि ठाकरे ब्रँड संपवायचा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, या एकाच रेषेवर सध्या दोन्ही नेत्यांचे मार्गाक्रमण आक्रमकपणे सुरू आहे. 5 जुलै नंतर युतीची चर्चा अंधातंरीच राहते की काय असे वाटत असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिला. या कौटुंबिक सोहळ्यातून एक राजकीय अजेंडा ठरेल का याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी

वरळी डोम येथे विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी असे एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते. त्यावर राजकीय पंडितांनी ही युतीची भविष्यातील नांदी असल्याचे भाष्य केले होते. आता दोन्ही भावांचे मनोमिलन झाले हे स्पष्ट झाले आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे अनेक अर्थ काढण्यात आले. त्याविषयीचे अर्थ काढण्यात येत आहेत. पण दरम्यान दोन्ही भावांनी वाढदिवसाचा योग साधत महायुतीला एक संदेश दिल्याचे म्हटले जात आहे.

6 वर्षांनी मातोश्रीवर

जानेवारी 2019 मध्ये राज ठाकरे हे त्यांचा मुलगा अमित यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन मातोश्रीवर आले होते. त्यापूर्वी आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांनी मातोश्रीकडे कधी वाट वळवली नव्हती. पण 5 जुलै रोजीच्या विजयी मेळाव्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे आज मातोश्रीवर दाखल झाले. या वेळी दोन्ही भावांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे हीयुतीच्या दृष्टीने मोठी घडामोड असल्याचे कार्यकर्त्यांना वाटते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.