- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
रुद्रनाथचे बाबा - कसं आहे ना बाळा, तू उत्तम गातोसच. त्यात प्रगती करशील; परंतु पोटापाण्यासाठी ठोस असे शिक्षण घ्यावे लागते, निदान आपल्या देशात तरी, छंद आणि व्यवसाय, किंवा छंद, आवड, हेच पुढे टीचभर पोट भरण्यासाठी उपयुक्त साधन, अशी शक्यता फारच थोड्या लोकांच्या नशिबी आली आहे. आपण मध्यमवर्गीयांनी तरी पाया आधी भक्कम करूनच मग, कला वगैरे चैनीचे उद्योग जोपासावेत. माझा आपला तुला परखड सल्ला आहे.
रुद्रनाथ (जरा नाराजीनेच आणि परंतु तडफेने, अल्प बंडखोरीच्या पावित्र्यात.) - तुम्ही म्हणतच असाल तर मी इंजिनिअरिंग वगैरे करीनही, परंतु ती ‘इअर ड्रॉप’ची भानगड मध्येच उपटली. ४ वर्षांच्या जागी ६ वर्षे लागली, तर मला उगा बोल लावू नका बरं !
रुद्रनाथची आई - अहो, तो एव्हढा आत्मविश्वासाने म्हणतोय ना, की मी शास्त्रीय संगीतात करिअर करणार म्हणून. त्याला आवड आहे. आत्ताच, या वयात त्याने चांगली लय पकडून, उत्तम प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. करू द्या त्याला, त्याच्या मनासारखे.
बाबा - तसं ठीक आहे गं, परंतु भविष्याचा काहीतरी विचार नको का करायला? अगं शास्त्रीय संगीतात करिअर करणे इतके सोपे आहे का? प्रचंड रियाज, मेहनत करावी लागते.
रुद्रनाथ - आहे माझी तयारी. बाबा मला सुरांचा लळा लागलाय. मला सुरांचा आत्मा, एखाद्या बंदिशीची ठेवण, समोर दिसतात हो. बरं मी एक पर्याय तुमच्यासमोर ठेवतो. मी ‘बी.सी.ए.’ करतो. म्हणजे काहीतरी पाया तयार होईल. मग मी माझा वेगळे काहीतरी करायला मोकळा.
उपरोक्त संवादातील प्रत्येक पात्राशी बोलताना मला मधूनच जाम हसू फुटायचे. रुद्रनाथच्या आईचे कौतुक वाटले. त्याच्या काळजीवाहू वडिलांचे वर्तन, हळूहळू विचारांमध्ये होणारा बदल,
मग धाडस गोळा करून, मुलाच्या करिअरसाठी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे मला प्रेरणादायी वाटले.
रुद्रनाथने मला समजेल अशा भाषेत, यमन राग ताना घेऊन, आकार लावून, फार भन्नाट समजून सांगितला. त्याची मेहनत, कष्टाने गळ्यावर स्वरसाज चढवण्याची ऊर्मी लक्षात आली. रुद्रनाथने नंतर विद्यापीठात रीतसर संगीतात एम.ए. केले. अतिशय अनुभवी, तज्ज्ञ गुरूंकडे तो सध्या मार्गदर्शन घेतो आहे. त्याच्या नसानसात संगीत भिनलेय, असा प्रत्यय वारंवार येत होता.
आत्यंतिक धोका पत्करून, आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्याचे रुद्रनाथ सोने करतोय. मी त्याला विचारले. ‘तू काही ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहेस का?’ अत्यंत आत्मविश्वासाने तो नाही म्हणाला. गाता गळा असलेल्या परंतु परिस्थितीवश संगीत हे करिअर निवडू न शकलेल्या, त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचे मुलाबद्दलचे कौतुकाचे भाव मला स्पष्ट दिसत होते.
रुद्रनाथने अनेक स्पर्धांमध्ये अव्वल क्रमांक पटकावून, अनेक शिष्यवृत्यांचा धनी ठरला आहे. ‘अर्थात संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी, असे वातावरण मिळणे अवघड आहे, याची मला जाणीव आहे. तरीपण कष्टाने या क्षेत्रात यश मिळवणारे दिग्गज आहेत. माझ्या डोळ्यासमोर त्या कलावंतांचा आदर्श आहे.’ असे रुद्रनाथ आत्मविश्वासाने सांगत होता.