लॉर्ड मेघनाद देसाई यांचे निधन
नवी दिल्ली, ता. २९ : प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि ब्रिटनच्या हाउस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड मेघनाद देसाई (वय ८५) यांचे मंगळवारी (ता. २९) निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित देसाई हे १९६५ ते २००३ पर्यंत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९७१ मध्ये त्यांनी मजूर पक्षात प्रवेश केला. जून १९९१ मध्ये त्यांची हाउस ऑफ लॉर्ड्समध्ये निवड झाली होती.
‘‘एक प्रतिष्ठित विचारवंत, लेखक आणि अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. ते नेहमीच भारत आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेले राहिले. भारत-ब्रिटन संबंध अधिक दृढ करण्यातही त्यांनी भूमिका बजावली,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.