लवकरच राज्यात मोठी उलथापालथ, सप्टेंबरनंतर काय घडणार? राऊतांच्या विधानाने खळबळ!
GH News August 01, 2025 05:12 PM

गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काही दिवस दिल्लीमध्ये मुक्काम ठोकून होते. आता राज्यात कोकाटे यांच्याकडील कृषीखाते काढून घेण्यात आले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय. मित्रपक्षांबरोबर काम करणं मला अवघड झालंय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाहांना सांगितल्याचा दावा राऊतांनी केलाय. तसेच सप्टेंबरपर्यंत वाट पाहा, असं म्हणत लवकरच काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत राऊतांंनी दिले आहेत.

त्या प्रकरणात मंत्र्याला जावं लागेल

राऊत आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. हे सरकार कलंकीत झालेलं आहे. मी खात्रीने सांगतो की मंत्र्‍यांना जावे लागेल. वसईच्या आयुक्तांवर धाड पडलेली आहे. हे 1000 कोटींचं प्रकरण आहे. या प्रकरणात एका मंत्र्‍यांना जावं लागेल. नव्या क्रीडामंत्रींना योग्य खाते मिळाले आहे. त्यांनाही जावे लागेल, असा मोठा दावा राऊत यांनी केला. तसेच ही व्यवस्था तात्पुरती सुरू आहे. प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

देवेंद्र फडणवीसांना ओझं झालंय

देवेंद्र फडणवीस-अमित शाहा यांच्या भेटीत काय झालं? या विषयी माझ्याकडे माहिती आली आहे. त्यामुळे काही काळ वाट पाहा, असे सूचक संकेतही राऊत यांनी दिले आहेत. मंत्र्‍याचे केलेले खातेबदल ही थातूरमातूर कारवाई आहे. आरोपी मंत्री आणि त्यांचे बॉस आपल्या माणसांना वाचवण्याचा काही प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच खातेबदलासारखे प्रकार केले जात आहेत. मात्र जनता, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर काहीही फरक पडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच याचं सगळं ओझं झालेलं आहे. त्यांनाही हे ओझं उचलून फेकायचं आहे.

सप्टेंबरपर्यंत वाट पाहा…

अमित शाहांच्या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की, या अशा लोकांबरोबर मला काम करणं अवघड झालं आहे. सरकारची, राज्याची बदनामी होत आहे. निर्णय घ्यावा लागेल, असं फडणवीस यांना अमित शाहा यांना भेटून सांगितल्याचा दावा राऊत यांनी केलाय. तसेच सप्टेंबरपर्यंत वाट पाहा. काय होतंय ते तुम्हाला मसजेलच, असं सूचक विधानही राऊत यांनी केलंय. त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय होणार आहे? राऊत यांच्या या विधानांचा नेमका अर्थ काय आहे, असे अनेक सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.