सीमेवर चीनला चोख प्रत्युत्तर :
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत सातत्याने स्वत:च्या सीमा आणि मित्रदेश असलेल्या शेजारीदेशांमध्ये पायाभूत सुविधा बळकट करत आहे. अलिकडेच भारताने भूतानच्या हा खोऱ्यात एक खास मार्ग निर्माण केला असून तो डोकलामनजकी आहे. हा मार्ग केवळ भूतानसाठी उपयुक्त नसून भारतासाठी देखील रणनीतिक सामर्थ्य वाढविणारा आहे.
हा मार्ग भूतानच्या हा खोऱ्याला जोडतो. हे खोरे डोकलामपासून केवळ 21 किलोमीटर अंतरावर आहे. डोकलाम हे क्षेत्र 2017 मध्ये भारत आणि चीनदरम्यान मोठ्या तणावाचे साक्षीदार ठरले होते. तर संबंधित मार्ग बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनने (बीआरओ) जवळपास 254 कोटी रुपये खर्चून तयार केला आहे.
भूतानचे पंतप्रधान तोब्गे त्शेरिंग यांनी शुक्रवारी या मार्गाचे उद्घाटन केले आहे. हा मार्ग सर्व ऋतूंमध्ये काम करणारा (ऑल-वेदर रोड) आहे, म्हणजेच पाऊस, हिमवृष्टी आणि वादळातही या रस्त्यावरून वाहतूक करणे शक्य ठरणार आहे. हा खोरे भूतानसाठी आर्थिक आणि सैन्यदृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण आहे. हा मार्ग केवळ स्थानिक लोकांसाठी सुविधाजनक नसेल, तर भूतानच्या सैन्याला चंबी खोऱ्यापर्यंत (जे तिबेटनजीक आहे) जलदपणे पोहोचण्यास मदत करणार आहे. चंबी खोऱ्यात चिनी सैनिक असल्याने हे क्षेत्र रणनीतिक स्वरुपात संवेदनशील आहे. गरज भासल्यास भारताचे सैन्यही या मार्गाचा लाभ घेऊ शकते, खासकरून चीनविरोधातील कुठल्याही स्थितीत या मार्गाचा लाभ होणार आहे.
2017 मध्ये डोकलाम येथे मोठा वाद झाला होता, चीनने जम्फेरी रिजपर्यंत रस्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, हा प्रकार भूतान आणि भारतासाठी धोक्याचा होता, भारतीय सैन्याने या रस्तेनिर्मितीला विरोध दर्शवत ‘ऑपरेशन जूनिपर’ राबविले. भारतीय सैनिकांनी डोकलाम येथे पोहोचून चिनी सैनिकांना रस्तेनिर्मितीपासून रोखले होते. 72 दिवसांपर्यंत चाललेल्या तणावानंतर चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागली होती. परंतु त्यानंतरही चीनने डोकलाममध्ये हेलिपॅड आणि अन्य सुविधा निर्माण केल्या आहेत. तसेच हजारो सैनिक तेथे तैनात केले आहेत. डोकलाम हे भूतानचे क्षेत्र असले तरीही ते सिक्कीम-भूतान-तिबेटच्या त्रिकोणावर आहे, जे भारतासाठी देखील रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण आहे. डोकलाममधील घटनेमुळे भारताला स्वत:च्या सीमावर्ती क्षेत्रातील पायाभूत सुविधानिर्मितीला वेग देणे भाग पडले आहे.
प्रोजेक्ट दंतक : भारत-भूतान मैत्रीचे प्रतीक
बीआरओच्या ‘प्रोजेक्ट दंतक’ अंतर्गत नवा मार्ग निर्माण करण्यात आला आहे. प्रोजेक्ट दंपक 1960 च्या दशकापासून भूतानमध्ये काम करत असून त्याच्या विकासात मोठे योगदान देत आहे. या मार्गात 5 नवे पूल निर्माण करण्यात आले आहेत. अलिकडेच भारतीय सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भूतानचा दौरा करत हा खोऱ्यातील मार्गाविषयी माहिती जाणून घेतली होती. बीआरओचे डीजीबीआर (डायरेक्टर जनरल बॉर्डर रोड्स) लेफ्टनंट जनरल रघू श्रीनिवास देखील भुतानमध्ये असून त्यांनी राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान तोब्गे त्शेरिंग यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी दंतक प्रकल्पाचे भूतानच्या विकासातील योगदानाचे कौतुक केले. डोकलाम येथील संघर्षानंतर भारताने भूतानमधील रस्तेनिर्मितीच्या कार्याला वेग दिला आहे. बीआरओ आणखी अनेक प्रकल्पांवर काम करत आहे