हौस ऑफ बांबू : दूधो नहाओ, पूतों फलो..!
esakal August 02, 2025 10:45 AM

नअस्कार! गेल्या रविवारी मला डब्बल श्रीखंड खावं लागलं, त्याची गोष्ट. सकाळी खास पाहुणे घरी येणार होते, म्हणून घाईघाईनं चितळेबंधूंचं श्रीखंड (अर्धा किलो) आणि बाकरवडी (अर्धाच किलो) घेऊन आले. पण त्याच दिवशी संध्याकाळी काकासाहेब चितळे यांच्या जीवनचरित्राच्या प्रकाशनाला जावं लागलं.

टिळक रोडवर न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये प्रकाशन सोहळा होता. आवार फुलून गेलं होतं. वडीच्या पारीत गच्च बाकर भरावं, तशी हॉलमध्ये गर्दी झाली होती. बरीचशी गर्दी हॉलबाहेरही सांडली होती. तेवढ्यात हॉलच्या दारात एक निळा कोट दिसला. वाटलंच मला! मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंदराव जोशी उभे होते. मी गर्रकन फिरले. वाटलं, पत्ता चुकला! चुकून ‘मसाप’त पोचल्ये की काय? पण तेवढ्यात तेच म्हणाले, ‘या, या, चितळ्यांचा कार्यक्रम इथंच आहे!’

आधी पुस्तकाबद्दल : ‘सहवेदनेकडून समृद्धीकडे’ हे दत्तात्रय उपाख्य काकासाहेब चितळे यांचं जीवनचरित्र आहे. लेखिका : वसुंधरा काशीकर. पाचेक वर्ष भिलवडीच्या आसपास अभ्यास करुन वसुंधराताईंनी काकासाहेबांचं जीवनचरित्र सिद्ध केलं. डेअरी व्यवसायाचा अभ्यासही थोडाफार केला. ते करती असताना म्हशीलाही बॉयफ्रेंड भेटला की बरं वाटतं, हे बघून त्यांना आश्चर्यच वाटलं म्हणे. असू दे, असू दे.

काकासाहेब हे खरे भारतातल्या धवल क्रांतीचे जनक. जेव्हा कृष्णामाईच्या तीरावरले सामान्य शेतकरी घरापुरतं गोधन कसंबसं सांभाळत होते, त्या काळात त्यांनी त्या गोधनातून भिलवडीचा पूर्ण इलाखा समृद्धीकडे नेला. दुधाचा धंदा करु नये, त्यानं दळिद्र येतं, ही भंपक अंधश्रध्दा त्यांनी मिटवली.

कल्पक उद्योजकता आणि ग्रामविकासाचं भाबडं स्वप्न यांचा हृदयंगम मिलाफ म्हणजे काकासाहेबांची जीवनकहाणी आहे. काचेच्या बाटल्यांपेक्षा पिशवीतून दूध देणं पहिल्यांदा काकासाहेबांच्या चितळे डेअरीनं सुरु केलं. आज पुण्यातल्या घराघरात सक्काळच्या पारी पुणेकरानं दार उघडावं तर ‘सकाळ’ आणि चितळे दुधाची पिशवी असलीच पाहिजे!!याच दोन पुणेरी उत्पादनांनी, म्हणजे ‘सकाळ प्रकाशन’ आणि ‘काकासाहेब चितळे फौंडेशन’नं हे पुस्तक रसिक वाचकांच्या भेटीसाठी आणलंय. त्याचाच प्रकाशन सोहळा होता. काकासाहेब चितळे हे धवलक्रांतीचे जनक म्हटले पाहिजेत. १९३९ पासून भिलवडीत चितळ्यांचा गोठा उभा राहिला.

त्या गोठ्याचं रुपांतर आता भव्य अशा प्रकल्पात झालं आहे. पाच-सात लिटर दुधापासून सुरु झालेला चितळ्यांचा व्यवसाय आता सात लाख लिटर दूध दोहतो आहे. चितळे हा मराठी संस्कृतीचा मानबिंदू झालाय. त्यांच्या बाकरवडीच्या साक्षीनं असंख्य मराठी विवाह ठरले. कांदेपोह्यांच्या बशीत बाकरवडी शिरली.

विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन यथासांग पार पडलं. ‘काकासाहेबांनी भिलवडीचं गोकुळ केलं’ असे कौतुकोद्गगार त्यांनी काढले, तेव्हा मला चक्क बासरीचे सूर ऐकू आले. सोहळ्याला समग्र चितळे परिवार उपस्थित होता. चितळ्यांची तिसरी आणि चौथी पिढी आता एकसंघपणे मैदानात उतरली आहे.

‘दूधो नहाओ, पूतो फलो’ हा आशीर्वाद वास्तवात उतरल्याचा साक्षात्कार मला झाला. प्रा. मिलिंद जोशी यांनीही नेहमीप्रमाणे दत्तात्रयाची जीवनकहाणी शंकर (अभ्यंकरां) च्या हस्ते प्रकाशित होतेय, वगैरे शाब्दिक बाकरवड्या वाटल्या.

बाय द वे, कार्यक्रमाच्या ठिकाणी अभ्यागतांसाठी किंगसाइज ढोकळा, सँडविच, मिठाई वगैरे प्लेटी पुढ्यात आल्यावर पुणेकर रसिक च्याटच पडले. असं कुठं प्रकाशन असतं का राव? अशानं बाकीचे प्रकाशक हैराण होतील त्याचं काय? पुण्यातले रसिक कमी समजू नका. निमंत्रण आलं की मेन्यू काय आहे, असं विचारायला कमी करणार नाहीत.

या सुंदर सोहळ्यात सगळं काही यथासांग होतं, फक्त बाकरवडी नव्हती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.